
हिंसाचाराच्या आगीने जळत असलेल्या मणिपूरमध्ये गेल्या 24 तासांत बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित 17 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. वेगवेगळय़ा चार जिह्यांतून त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे आज पोलिसांनी सांगितले. गुरुवारी बिष्णुपूर जिह्यातून कांगलेई यावोल कन्ना लुप (केवायकेएल) या संघटनेशी संबंधित 13 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी सात दिवसांचा अल्टिमेटम दिल्यानंतर एका दिवसात ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून विविध सामग्री आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. त्यांना पुढील चौकशीसाठी राजधानी इम्फाळ येथे नेण्यात आले आहे.
तसेच इम्फाळ पूर्व जिह्यातून युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेला दहशतवादी खंडणीच्या कारवायांमध्ये सहभागी होता, असे पोलिसांना आढळून आले. याशिवाय बिष्णूपूर जिह्यातून कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टी, कक्चिंग जिह्यातून कांगले यावोल कन्ना लुप आणि इम्फाळ पश्चिम जिह्यातून केसीपी या संघटनेच्या दहशतवाद्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान, गावातील स्वयंसेवकाला अटक केल्यामुळे काकचिंग जिह्यात निदर्शकांनी रस्त्याच्या मधोमध टायर जाळले.
‘अरे कटिका’ समाजाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
मणिपूरमध्ये काय झाले माहीत आहे ना? अशा याचिका कशा काय ग्राह्य धरल्या जाऊ शकतात, असा उलट सवाल याचिकाकर्त्याला करत सर्वोच्च न्यायालयाने आज अरे-कटिका म्हणजेच खाटिक या समुदायाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. आम्ही इथे अर्धविरामही जोडू शकत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा बदल करू शकत नाही. जे काही होऊ शकते ते संसदेत. उच्च न्यायालयही इथे काही करू शकत नाही.