
उद्योजक गौतम अदानी हे वैयक्तिक प्रकरण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसार माध्यमांसमोर सांगितले. परंतु, हे प्रकरण वैयक्तिक नाही, तर देशातील भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे, असा हल्ला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रायबरेली येथील गेस्ट हाऊसमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मोदी सरकारवर केला.
मोदी म्हणतात, मी याप्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारणार नाही. अदानी यांच्याविरोधात अमेरिकेत खटला दाखल आहे. भ्रष्टाचार आणि चोरीचे आरोप आहेत. असे असताना मोदी तिथे जाऊन म्हणतात, हे आमचे वैयक्तिक प्रकरण आहे. यावर आम्ही चर्चा करणार नाही. अदानीवर अमेरिकेत कारवाई झाली. हिंदुस्थानात ही कारवाई का होत नाही, असा सवालही राहुल गांधींनी केला. अमेरिकेतील सरकारसाठी अदानी भ्रष्टाचारी आणि चोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत का प्रश्न विचारले जात नाहीत, असा सवालही राहुल गांधी यांनी यावेळी उपस्थित केला.