
तुम्ही रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासमोर कमजोर पडू शकत नाही. हा तुमचा ट्रेडमार्क नाही. तुम्ही जर पुतिन यांच्यासमोर कमजोर पडलात तर चीनला कसे सामोरे जाल, असे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची लोकप्रियता घटल्याचे म्हटले होते. तसेच त्यांना हुकूमशहा संबोधले होते. त्यानंतर मॅक्रोन हे झेलेन्स्कीच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. झेलेन्स्की यांना मुक्त यंत्रणेच्या माध्यमातून निवडण्यात आले आहे, असेही मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. त्यामुळे युक्रेन आणि रशिया युद्धाचा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये जवळपास तीन वर्षांपासून सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष थांबवण्याच्या दृष्टीने अमेरिका प्रयत्न करत आहे. हा मुद्दाही केंद्रस्थानी ठेवून मॅक्रॉन यांनी ट्रम्प यांना ते रशियासमोर कमजोर पडू शकत नाहीत असे म्हटले आहे. पुतिन हे दीर्घकाळापासून सत्तेवर आहेत. आपल्या विरोधकांना संपवून आणि निवडणुकांमध्ये फेरफार करून त्यांनी सत्ता राखली आहे. तशी स्थिती झेलेन्स्की यांची नाही. ते मुक्त निवडणूक यंत्रणेद्वारे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडले गेले आहेत याकडे मॅक्रॉन यांनी लक्ष वेधले आहे. मॅक्रॉन हे 23 फेब्रुवारी रोजी ट्रम्प यांची भेट घेणार असल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. त्यापूर्वी मॅक्रॉन यांनी आपली भूमिका मांडली आहे.
हिंदुस्थानचा तो निधी म्हणजे लाचखोरी – ट्रम्प
हिंदुस्थानातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी देण्यात येणारा तब्बल 182 कोटी रुपयांचा निधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रोखला. या निधीवरून ट्रम्प यांनी आज तिसऱ्यांदा निशाणा साधला आहे. हा निधी म्हणजे लाचखोरी होती, असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. हिंदुस्थानातील मतदानाच्या टक्केवारीची चिंता मी करू? आपल्याला अमेरिकेतील मतदानाच्या टक्केवारीची चिंता करायला हवी. असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
भाजपने सतत खोटे पसरवले – काँग्रेस
मुळात 182 कोटींचा निधी बांगलादेशसाठी होता. भाजपच्या आयटी सेलने सर्वत्र खोटे पसरवले, असा आरोप काँग्रेसने एक्सवरून केला आहे. आता भाजपने उत्तर द्यायला हवे की, अमेरिकेची खोटी बातमी हिंदुस्थानात पसरवून देशविरोधी काम का केले? ट्रम्प आणि मस्क वारंवार हिंदुस्थानचा अपमान का करत आहेत? तसेच मोदींनी मित्र अदानीला वाचवण्यासाठी हिंदुस्थानच्या आत्मसन्मानाशी तडजोड केली आहे का, असा सवालही काँग्रेसने केला.