
महाकुंभसाठी जाणाऱ्या भाविकांची नवी दिल्ली रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी उसळल्याने पायाखाली चिरडून 18 जणांचा मृत्यू झाला होता. या चेंगराचेंगरीचे व्हिडीओ 36 तासांत डीलीट करण्याचा फतवा रेल्वे मंत्रालयाने काढला असून, त्याच्या तब्बल 250 लिंकही पाठवल्या आहेत. विशेष म्हणजे, रेल्वे मंत्रालयाने आपल्या निर्णयाचे समर्थन केले असून नैतिक नियम आणि आयटी धोरणाचा दाखला दिला आहे. सरकारच्या या फतव्यानंतर सरकारचे गैरव्यवस्थापन झाकण्याचाच हा प्रयत्न असल्याची टीका होत आहे.
रेल्वे मंत्रालयाने एक्सला एक पत्र लिहून सर्व व्हिडीओ आणि फोटो आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यास सांगितले आहे. व्हिडीओ अतिशय भयंकर असून त्यात जिकडे तिकडे चपला, शाळकरी मुलांच्या बॅगा, पाण्याच्या बाटल्या, इतर साहित्य विखुरलेले दिसत आहे. बेशुद्ध आणि मृत्युमुखी पडलेले भाविक दिसत आहेत. दरम्यान, रेल्वे मंत्रालयाच्या पत्रावर एक्सने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही.
रील मंत्र्यांच्या चुका लपवण्यासाठी – काँग्रेस
रील मंत्र्यांनी आपल्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी आणि अपयश झाकण्यासाठी मनमानी कारभार सुरू केला आहे. चेंगराचेंगरीचे व्हिडीओ हटवण्याचे आदेश देणे म्हणजे एकप्रकारे आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढणे आहे, असा आरोप काँग्रेसने एक्सद्वारे केला आहे. रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा देण्याऐवजी उलट व्हिडीओ हटवण्याचा फतवा काढला. रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेचे वाटोळे केले आहे. प्रवाशांना सुरक्षित प्रवास आणि सुविधा देण्यात ते सपशेल फेल गेले आहेत, असेही काँग्रेसने म्हटले आहे.
चेंगराचेंगरीचे फोटो हटवण्यापेक्षा रेल्वे मंत्र्यांनाच हटवा – आदित्य ठाकरे
चेंगराचेंगरीचे फोटो हटवण्यापेक्षा रेल्वे मंत्रालय सांभाळण्यात अपयशी ठरलेल्या रेल्वेमंत्र्यांनाच का हटवू नये, असा सवाल शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टद्वारे केला आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाचा गैरवापर करून रेल्वेमंत्र्यांनी एक्सवरील फोटो हटवण्यास सांगितले आहेत. अपयश झाकण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी. रेल्वे मंत्रालय चालवण्यासाठी चांगल्या व्यक्तीची गरज आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी रेल्वेमंत्र्यांना सुनावले आहे. केंद्राला पुठलीच जबाबदारी स्वीकारायची नाही हेच यातून सिद्ध होत असून, हा देश आता लोकशाही देश राहिलेला नाही. ही लोकशाही परत आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.