ज्युनियर ‘मुंबई श्री’चा थरार उद्या मालाडमध्ये; दिव्यांग, मास्टर्स, महिलांच्या शरीरसौष्ठवासह फिजीक स्पोर्ट्सचाही समावेश

उदयोन्मुख आणि ज्युनियर शरीरसौष्ठवपटूंच्या हक्काचे व्यासपीठ असलेली ‘ज्युनियर मुंबई श्री’ रविवारी 23 फेब्रुवारीला मालाड पूर्वेला कासम बागेत असलेल्या दीनदयाल उपाध्याय मैदानावर आयोजित केली जाणार आहे.  या स्पर्धेत सुमारे 100-120 खेळाडू आपल्या नव्याकोऱ्या शरीरयष्टीला लोकांसमोर फुगवणार असून या स्पर्धेतूनच मुंबई शरीरसौष्ठवाचे भवितव्य पाहायला मिळेल. या स्पर्धेत आजच्या तरुणाईचा आवडता प्रकार असलेल्या फिजीक स्पोर्ट्सचाही समावेश करण्यात आला आहे.  त्यामुळे फिट असलेली तरुणाई वेगळ्या पोझेस मारताना दिसेलच, पण या स्पर्धेबरोबर दिव्यांग, महिला आणि मास्टर्स शरीरसौष्ठवपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या गटाच्या मुंबई श्रीचे आयोजनही करण्यात आले आहे.

शरीरसौष्ठव खेळाची बालवाडी असलेल्या स्पर्धेसाठी मुंबईकर ज्युनियर खेळाडू गेले तीन-चार महिने जोरदार व्यायाम करीत आहेत. या स्पर्धेत आपल्याला फार मोठे खेळाडू पाहण्याची संधी नसली तरी सहभागी स्पर्धक भविष्यात देशाचे प्रतिनिधित्व करताना दिसतील, असा विश्वास बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे (जीबीबीबीए) अध्यक्ष अजय खानविलकर यांनी व्यक्त केला. ही स्पर्धा दोन्ही संघटनांच्या संयुक्त आयोजनाखाली रंगणार असून जय वरदानी ट्रस्टच्या पुढाकाराने एक लाखांपेक्षा अधिक रोख बक्षिसांचा वर्षाव विजेत्यांवर केला जाणार आहे. एपंदर सहा गटांच्या या स्पर्धेचा विजेता 15 हजार रुपयांच्या रोख पुरस्काराचा मानकरी ठरेल, अशीही माहिती खानविलकर यांनी दिली.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी विशाल परब (8928313303), राम नलावडे (9820662932) सुनील शेगडे (9223348568), विजय झगडे (9967465063), किरण पुडाळकर (9870306127), राजेश निकम (9969369108) यांच्याशी संपर्प साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.