
इलेक्ट्रीसिटी हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. विजेचे कनेक्शन नाकारल्यास राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होईल, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
गोरेगावातील (प) भगत सिंग नगर-1मधील रहिवाशांच्या शिव शक्ती वेल्फेअर असोसिएशनने घरगुती विजेच्या कनेक्शनसाठी याचिका केली होती. येथे तिवरे होती. आता नाहीत. परिणामी तेथे सब स्टेशन उभारण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मुख्य मागणी करण्यात आली होती. मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. येथे तिवरे होती याचा विचार न्यायालयाने करावा, असा युक्तिवाद राज्य शासनाने केला. तो फेटाळून लावत खंडपीठाने असोसिएशनची मागणी मान्य केली.