ICC Champions Trophy 2025 – रिकल्टनचे शतक आणि शतकी विजय

‘जायंट किलर’  अफगाणिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या लढतीतच दक्षिण आफ्रिकेकडून 107 धावांनी पराभव सहन करावा लागला. रायन रिकल्टनच्या 103 धावांच्या शतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने उभारलेले 316 धावांचे आव्हान अफगाणिस्तानला पेललेच नाही आणि त्यांचा संघ 208 धावांतच आटोपला.

दक्षिण आफ्रिकेच्या 316 धावांचा अफगाणी फलंदाज पाठलाग करतील अशी अपेक्षा होती, पण त्यांच्या आघाडीच्या रहमानुल्लाह गुरबाज (10), इब्राहिम झदरान (17), सेदिकुल्लाह अटल (16), कर्णधार हशमतुल्लाह आफ्रिदी (0) आणि अझमतुल्लाह ओमरझई (18) या फलंदाजांनी निराशा केल्यामुळे अफगाणिस्तानने 6 बाद 120 अशा स्थितीतच सामना गमावला होता. फक्त रहमत शाहने शेवटपर्यंत झुंजार आणि आक्रमक खेळी करत अफगाणिस्तानला दोनशेचा टप्पा गाठून दिला. तो 92 चेंडूंत 90 धावा करून सर्वात शेवटी बाद झाला आणि अफगाणींच्या पराभवावर 44 व्या षटकात शिक्कामोर्तब झाले. कगिसो रबाडाने 36 धावांत 3 विकेट घेत आफ्रिकेला शतकी विजय मिळवून दिला. शतकवीर रिकल्टनलाच शतकी विजयाचा शिल्पकार म्हणून पुरस्कार लाभला.

त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकेची निराशाजनक सुरुवात झाली. टोनी डी झॉर्झी 11 धावा करून तंबूत परतला. मात्र, त्यानंतर रायन रिकल्टन आणि टेंबा बवुमा यांनी डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी 129 धावांची भागीदारी केली. 76 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीने 58 धावांची अर्धशतकी खेळी करून बवुमा तंबूत परतला. त्यापाठोपाठ 103 धावांची तुफानी शतकी खेळी करून रिकल्टनने दक्षिण आफ्रिकेला 200 धावांचा टप्पा गाठून दिला. त्यानंतर रॅसी वॅनडर डुसेन (52), एडन मार्परम (ना. 52) यांच्या अर्धशतकामुळे आफ्रिकन संघ 6 बाद 315 धावांपर्यंत पोहचू शकला. अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने 2 विकेट टिपल्या. फझल फारुकी, ओमरझई आणि नूर अहमदला प्रत्येकी एक विकेट मिळवता आला.