Ranji Trophy केरळचे भाग्य पुन्हा फळफळले

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जम्मू-कश्मीरविरुद्ध अवघ्या एका धावेच्या आघाडीमुळे उपांत्य फेरीत स्थान मिळवणाऱ्या केरळचे पुन्हा एकदा भाग्य फळफळले आहे. उपांत्य सामन्याच्या शेवटच्या दिवशी गुजरातला आघाडी घेण्यासाठी अवघ्या 27 धावांची गरज होती, पण आज आदित्य सरवटेने सामन्याला कलाटणी देत जयमीत पटेलची विकेट काढली. मग सिद्धार्थ देसाईचीही विकेट काढत गुजरातची 9 बाद 446 अशी अवस्था करत सामन्याला रंगतदार स्थितीत आणले. गुजरातला अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी 12 धावांची गरज होती आणि केरळला फक्त एक विकेट हवी होती. गुजरात पहिल्या डावात आघाडी घेण्यापासून 3 धावा दूर असताना सरवटेच्या चेंडूला फटकावण्याच्या प्रयत्नात अरझन नागवासवालाचा फटका शॉर्टलेगला उभ्या असलेल्या सलमान निझारच्या हेल्मेटवर आदळला आणि तो चेंडू स्लिपमध्ये उभ्या असलेल्या सचिन बेबीच्या हातात विसावला. केरळने विदर्भचा पहिला डाव 455 धावांवर संपुष्टात आणत अवघ्या दोन धावांची आघाडी घेत प्रथमच अंतिम फेरी गाठण्याची किमया साधली. या स्पर्धेत अद्याप अपराजित असलेले केरळ आणि विदर्भ जेतेपदासाठी भिडणार असले तरी केरळचे नशीब यंदा बलवत्तर असल्यामुळे रणजी करंडकाला नवा विजेता लाभला तरी आश्चर्य वाटणार नाही. केरळने दुसऱ्या डावात 4 बाद 114 अशी मजल मारत सामना अनिर्णितावस्थेत सोडवला.