पालिका निवडणुकांबाबत 25 फेब्रुवारीला सुनावणी

संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या तसेच तीन वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने 25 फेब्रुवारीला सुनावणी निश्चित केली आहे. यावेळी महापालिकांतील प्रभाग रचनेच्या मुद्दय़ावर राज्य सरकार युक्तिवाद करणार आहे. त्यामुळे या सुनावणीत पालिका निवडणुकांचा मुहूर्त ठरतोय की लांबणीवर पडतोय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जानेवारीत झालेल्या सुनावणीवेळी गुंता सुटण्याची चिन्हे होती. मात्र राज्य सरकारने पुन्हा वेळकाढू भूमिका घेतली. त्यामुळे सुनावणीचे घोंगडे भिजत पडले आणि मुंबई, ठाण्यासह राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकांबाबत अनिश्चितता कायम राहिली. निवडणुकीचे प्रकरण न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. के. सिंग यांच्या खंडपीठासमोर कार्यतालिकेवर 29 व्या क्रमांकावर सुनावणीसाठी ठेवले आहे.