
तब्बल दहा वर्षांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना एक वर्षाचा बीएड आणि एमएड अभ्यासक्रम करण्याची संधी दिली जाणार आहे. अर्थात राष्ट्रीय शिक्षण धोरणाला अनुसरून लागू करण्यात आलेला चार वर्षांचा पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱयांनाच हे एक वर्षांचे अभ्यासक्रम करता येतील. तसेच, या अभ्यासक्रमांचे प्रवेश नीटसारख्या केंद्रीय प्रवेश परीक्षेद्वारे करण्याचे प्रस्तावित आहे.
सध्याचे दोन वर्षांचे आणि इंटिग्रेटेड बीएड-एमएड अभ्यासक्रम सुरूच राहणार आहेत. मात्र एनईपीला अनुसरून अभ्यासक्रमात बदल करण्याची गरज व्यक्त होत होती. त्यानुसार नॅशनल कौन्सिल फॉर टीसर्स एज्युकेशन या शिक्षकांच्या अध्यापन विषयक अभ्यासक्रमांचे नियमन करणाऱ्या केंद्रीय यंत्रणेने बीएड-एमएड अभ्यासक्रमांच्या स्वरूपात बदल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. केवळ चार वर्षांचा पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांनाच एक वर्षाचा बीएड-एमएड करता येईल. तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम केलेल्यांना दोन वर्षांचा बीएड अभ्यासक्रमच करावा लागेल.
- पूर्वी बीएड-एमएड एक वर्षांचेच होते. पुढे दर्जा उंचावण्याकरिता न्या. वर्मा आयोगाच्या शिफारसीनंतर 2014मध्ये हे अभ्यासक्रम एकाऐवजी दोन वर्षांचे करण्यात आले होते. एनसीटीईने प्रस्तावित केलेला ‘एनसीटीई (मान्यता निकष आणि प्रक्रिया) नियम, 2025’ हा प्रस्तावित आराखडा मंजूर झाल्यास पुन्हा ते प्रत्येकी एक वर्षाचे होतील. नव्या आराखडय़ानुसार कला, शिक्षण, योग, शारीरिक शिक्षण, संस्कृत अशा विविध विषयांमध्ये विशेष शिक्षण घेता येणार आहे. या प्रस्तावित आराखडय़ावर 8 मार्चपर्यंत सूचना मागविण्यात येत आहेत.
- एक वर्षाच्या प्रस्तावित बीएडमध्ये दोन सत्रांसह शाळेतील इंटर्नशिप, प्रत्यक्ष अनुभवाधारित अध्यापनाबरोबरच शिकविण्याचा सराव यांचा समावेश असेल. तर एमएडमध्ये संशोधन प्रबंध सादर करावा लागेल. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (एनईपी) पायाभूत, प्रीपेटरी, मिडल, सेकंडरी असे चार स्तर निश्चित करण्यात आले आहे. बीएड केल्यानंतर विद्यार्थ्यांना एमएड करता येईल. हा अधिक अॅडव्हान्स दर्जाचा अभ्यासक्रम असेल. दोन्ही अभ्यासक्रमांकरिता पदवी-पदव्युत्तर पदवीत किमान 50 टक्के गुणांची पात्रता बंधनकारक असेल.