
अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे हे आंतरराष्ट्रीय स्टार्स विदर्भच्या गोलंदाजांपुढे धडपडल्यामुळे रणजीविजेत्या मुंबईचे 43वे रणजी करंडक जिंकण्याचे स्वप्न उपांत्य फेरीतच भंग पावले. विदर्भने आपल्या गेल्या मोसमातील अंतिम फेरीतील पराभवाचा वचपा गाठताना मुंबईला 80 धावांनी नमवले आणि चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली. आता त्यांची गाठ नाटय़मयरीत्या अवघ्या दोन धावांच्या आघाडीमुळे प्रथमच अंतिम फेरी गाठणाऱ्या केरळशी पडेल. येत्या 26 फेब्रुवारी ते 2 मार्चदरम्यान जामठय़ाच्या व्हीसीए स्टेडियमवर अंतिम सामना खेळला जाईल.
गेल्या चार दिवसांप्रमाणे पाचव्या दिवशीही विदर्भानेच सामन्यावर वर्चस्व गाजवले. फरक फक्त इतकाच होता की, मुंबईच्या तळाच्या फलंदाजांनी (तळंदाजांनी) पुन्हा आपला झुंजार खेळ दाखवत विजयाच्या आशा शेवटपर्यंत जिवंत ठेवल्या होत्या. मुंबईसमोर विदर्भाने 406 धावांचे जबरदस्त आव्हान उभारले होते. मात्र कालच मुंबईने 83 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे आज सूर्यकुमार यादव, शिवम दुबे या धडाकेबाज फलंदाजांना मुंबईला अंतिम फेरीत पोहोचविण्याची नामी संधी होती. पण यादव (23) आणि दुबे (12) यांनी पुन्हा एकदा आपली विकेट लवकर गमावत मुंबईला वाऱयावर सोडले.
तळंदाजांच्या 201 धावा
शेवटच्या दिवशी मुंबईला 323 धावांचा पाठलाग करायचा होता. मुंबईची झुंजारवृत्ती पुन्हा एकदा सामन्यात पुनरागमन करील अशी अपेक्षा होती. पण आज खेळ सुरू होताच सूर्यकुमार यादव, शिवम दुबेसह गेल्या डावात 106 धावांची खेळी करणारा आकाश आनंदही (39) बाद झाल्यामुळे मुंबईची 6 बाद 124 अशी बिकट अवस्था झाली होती. तेव्हाच मुंबईचा पराभव निश्चित मानला जात होता; पण नेहमीप्रमाणे मुंबईच्या तळंदाजांनी किल्ला लढवत मरणावस्थेत असलेल्या सामन्यात जान आणली. शार्दुल ठापूर आणि शम्स मुलाणीने सातव्या विकेटसाठी 103 धावांची मुंबईच्या डावाला ऑक्सिजन देणारी भागी रचली आणि सारा माहोलच बदलून टाकला. पण तेव्हाच मालेवारने मुलाणीला धावचीत करत ही भागी पह्डली. शार्दुल आणि तनुष मुंबईला पराभवाच्या संकटातून बाहेर काढतील, अशा आशा निर्माण झाल्या होत्या. पण शार्दुलची झुंज 66 धावांवरच संपली.
शेवटच्या जोडीने विजय लांबवला
शार्दुल बाद झाला तेव्हा मुंबईचा संघ विजयापासून 152 धावा दूर होता. तेव्हा आधी तनुष कोटियनने 26 धावा ठोकल्या. तनुष बाद होताच मुंबई संघ पराभवासमीप पोहोचला होता. त्याचवेळी मोहित अवस्थी (34) आणि रॉयस्टन डेव्हिस (ना. 23) यांनी दहाव्या विकेटसाठी 52 धावांची भागी रचून विदर्भचा विजय लांबवण्याचा प्रयत्न केला. अखेर हर्ष दुबेने मोहितला पायचीत करत मुंबईच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले आणि डावात आपली पाचवी विकेटही काढली. पहिल्या डावात 54 आणि दुसऱया डावात 151 धावांची संयमी खेळी करणारा यश राठोड विदर्भाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
विदर्भ चौथ्यांदा अंतिम फेरीत
विदर्भने 2017-18 आणि 2018-19 या मोसमात सलग रणजी विजेतेपद जिंकले. त्यानंतर गेल्या वर्षी त्यांनी तिसऱयांदा अंतिम फेरीत धडक मारली. मात्र मुंबईने त्यांचा पराभव करत आपले 42 वे जेतेपद संपादले होते. आता त्यांनी त्याच पराभवाचा वचपा काढताना मुंबईला उपांत्य फेरीत हरवत आपल्या कारकीर्दीत चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली.