
जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्ला एप्रिलपासून हिंदुस्थानात पाय रोवणार असून कारविक्रीलाही सुरूवात करणार आहे. परंतु, ही कार सर्वसामान्यांना परवडणारी नाही. मध्यमवर्गीय आणि श्रीमंत वर्गालाही ही कार जवळपास दुप्पट पैसे देऊन विकत घ्यावी लागेल. कारण, 21 लाखांची कार 36 लाखांना मिळणार आहे. ऑनरोड या कारची किंमत आणखी वाढणार आहे. दरम्यान, टेस्ला हिंदुस्थानात केवळ कारविक्री करणार आहे. प्रत्यक्षात निर्मिती युनिट लावणार नाही. जर्मनीतील बर्लिन-ब्रांडेनबर्गच्या गीगा फॅक्ट्रीत बनलेल्या कार कंपनी हिंदुस्थानात विक्रीसाठी आणणार आहे. कंपनी येथे सर्वात स्वस्त ईलेक्ट्रॉनिक कार उतरवण्याचा दावा करत आहे. या कारची किंमत 25 हजार डॉलर म्हणजेच 21.71 लाख रुपये असू शकते. परंतु, हे मॉडेल कोणते असेल याची माहिती देण्यात आलेली नाही.
दिल्ली आणि मुंबईत दोन शोरूम्स
टेस्लाचे मालक एलन मस्क सुरुवातीला मॉडेल 3 आणि मॉडेल वाय कारही लॉन्च करू शकतात. दोन्ही मॉडेल्सची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल 44 हजार डॉलरहून अधिक आहे. कंपनीने हिंदुस्थानात पहिल्या दोन शोरूम्ससाठी जागा निश्चित केली आहे. पहिले शोरूम नवी दिल्लीतील एअरोसिटी हे ठिकाण इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आहे. तर मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये दुसरी जागा निश्चित करण्यात आली आहे अशी सध्या माहिती मिळत आहे.
हिंदुस्थानचे सीमा शुल्क धोरण काय
सध्या आयात केलेल्या ईव्ही कारवर 75 टक्के सीमा शुल्क लागते. परंतु, कंपनीने केंद्रसमवेत करार केल्यास त्यांना 35 हजार डॉलरहून अधिक किमतीच्या कारवर 15 टक्के सूट मिळते. परंतु, त्यासाठी कंपनीने वार्षिक 8 हजारांहून अधिक कार विकता कामा नये. तसेच अशा कंपन्यांना 5 वर्षात हिंदुस्थानात निर्मिती सुरू करावी लागेल ही दुसरी अट आहे. दरम्यान, हिंदुस्थानचे हे सीमा शुल्क धोरण बदलण्याची चर्चा असून मार्च 2025
अखेरीपर्यंत नवीन धोरण येण्याची शक्यता आहे.