वृद्ध आईला घरात कोंडून मुलगा कुंभमेळ्यात

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 26 फेब्रुवारीपर्यंत कुंभमेळा आहे. देश-विदेशातील हजारो लोक दररोज कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी जात आहेत. झारखंडमधील रामगड जिह्यातील एका मुलाने मात्र कहरच केला. कुंभमेळ्यात जाऊन पुण्य कमवण्यासाठी या मुलाने चक्क आपल्या वृद्ध आईला घरात कोंडले आणि कुंभमेळ्याला निघून गेला. वृद्ध आई तीन दिवस कशीबशी राहिली, परंतु नंतर प्रचंड भूक लागल्याने तिने आरडाओरड करायला सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घराचे कुलूप तोडले. घरातील दृश्य पाहून त्यांना प्रचंड धक्का बसला. उपाशी राहिल्यामुळे वृद्ध महिला प्लॅस्टिक खाण्याचा प्रयत्न करत होती. ती प्रचंड रडत होती. तिला प्रचंड अशक्तपणा आला होता. या वृद्ध महिलेचे वय 65 वर्षे आहे. वृद्ध आईला घरात कोंडून जाणाऱ्या मुलाविरोधात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. शेजाऱ्यांनी वृद्ध महिलेच्या मुलीला आणि भावाला या घटनेची माहिती दिली. तसेच पोलिसांना याबाबत सांगितले.

मुलाशी साधला संवाद

पोलिसांनी कुंभमेळ्याला गेलेल्या मुलाशी फोनवरून संवाद साधला. त्या वेळी त्याने सांगितले की, रात्री 11 वाजता आम्ही घर सोडले. जाण्यापूर्वी आईला जेवण दिले होते. घरात जेवण ठेवले होते. आईनेच आम्हाला कुंभमेळ्याला जाण्यास सांगितले.