
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
‘हिंदुस्थान एरोनॉटिक्सविषयी मला भरवसा वाटत नाही. तुम्ही मिशन मोडमध्ये आहात असे वाटतच नाही’, अशी तीव्र नाराजी भारताच्या हवाई दल प्रमुखांनी नुकतीच व्यक्त केली, जी योग्य होती. हवाई दलास लढाऊ विमानांच्या 42 तुकड्यांची गरज आहे. पुढील काळात निरोप घेणाऱ्या बहुसंख्य विमानांची जागा तेजसला देण्याचे नियोजन आहे. या परिस्थितीत तेजसच्या उत्पादनास होणारा विलंब हवाई दलाच्या लढाऊ क्षमतेवर परिणाम करेल.
तेजस-एमके-1ए या विमानांसंदर्भात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड विरोधात हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी नुकतेच जे स्पष्ट प्रतिपादन केले त्याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे. बंगळुरूत ‘एरो इंडिया’ भव्य प्रदर्शन सुरू होते. जगभरातील देशांनी या प्रदर्शनात त्यांच्याकडील लढाऊ आणि प्रवासी विमाने त्यांची क्षमता, करामतींसह सादर केली. या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या दिवशी एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग आणि लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या तेजस भरारीची चर्चा झाली. परंतु तेजसमधून भरारी घेतली असली तरी हा प्रकल्प अजूनही फार मागे आहे. त्यामुळेच प्रदर्शनातच हवाई दल प्रमुखांनी ‘तेजस’चे निर्माते हिंदुस्थान एरॉनॉटिक्सला खडे बोल सुनवले.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ही सरकारी कंपनी हलक्या वजनाची ‘तेजस – एमके-1 ए’ लढाऊ विमाने वेळेत वितरित करू शकेल याबद्दल शाश्वती नसल्याचे वक्तव्य हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनी मागच्या आठवडय़ात केले. उत्पादनातील विलंबामुळे भारतीय हवाई दलात लढाऊ विमानांची संख्या 31 तुकडय़ांहून (31 Squadron’s) कमी संख्येवर पोहोचली आहे.
तेजस लढाऊ विमानांच्या उत्पादनातील विलंबावर हवाई दल प्रमुखांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘एचएएलला हवाई दलाची चिंता कमी करावी लागेल. आम्हाला आत्मविश्वास द्यावा लागेल. मात्र सध्या एचएएलबद्दल विश्वास नाही.’
एचएएलने फेब्रुवारीपर्यंत 11 ‘तेजस-एमके-1ए’ विमानांचे उत्पादन करण्याचे आश्वासित केले होते. प्रत्यक्षात एकही विमान अद्याप तयार नाही. ‘एरो इंडिया’ प्रदर्शनात हवेत झेपावलेल्या विमानास ‘तेजस एमके-1ए’ म्हणून सांगितले गेले. त्यावरही सिंग यांनी आक्षेप घेतला. ते विमान ‘एमके-1ए’ नाही. नाव बदलण्यामुळे ते प्रगत होत नाही. जेव्हा शस्त्रे समाविष्ट होतील, क्षमता सिद्ध होईल तेव्हा ते ‘एमके – 1 ए’ असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. एचएएलचे अधिकारी ‘उत्पादनात कोणतीही कसर सोडली जाणार नाही, असे सांगत होते, पण गेली अनेक वर्षे एचएएलला आपली कामगिरी सुधारता आली नाही.’
तेजस ही हलकी लढाऊ विमाने भारतीय हवाई दलाचा कणा ठरतील, असे नियोजन होते. तेजसचे वैशिष्टय़ म्हणजे ते बऱ्याच प्रमाणात देशी बनावटीचे आहे. मात्र तेजस प्रकल्पाचे गेल्या कित्येक वर्षांचे वैशिष्टय़ म्हणजे या विमानांच्या निर्मितीस व ती हवाई दलात दाखल होण्यास झालेला अक्षम्य विलंब. 1984 मध्ये प्रकल्पाची संकल्पना मांडली गेली. 17 वर्षांनी म्हणजे 2001मध्ये पहिले विमान उडाले. त्याहीनंतर 16 वर्षांनी म्हणजे 2017 मध्ये ही विमाने दाखल होण्यास सुरुवात झाली. ती आहेत ‘तेजस मार्क वन’ या उपप्रकारातली. ‘तेजस मार्क वन’ या प्रकारातील 40 पैकी 36 विमानेच हवाई दलात दाखल झाली आहेत. चार अजूनही प्रलंबित आहेत.
हवाई दलाकडून वारंवार व्यक्त होणाऱ्या चिंतेविषयी एचएएलचे प्रमुख डी. के. सुनील यांनी हवाई दलाच्या लढाऊ क्षमतेवर परिणाम होत असल्याने त्यांची चिंता समजण्याजोगी असल्याचे म्हटले. डी. के. सुनील यांनी थेट पोखरण – 2 अणुचाचण्यांनंतरच्या अमेरिकी निर्बंधांचा दाखला दिला. विलंब आपल्यामुळे नव्हे, तर इतर बाह्य घटकांमुळे होत आहे, असे सांगून वेळ मारून नेली. एचएएलने आता सर्व म्हणजे ‘एमके-1ए’ विमानाच्या संरचना तयार करण्याचे आश्वासन दिले आहे. इंजिन पुरवठ्याशी संबंधित समस्या सोडवली जात आहे. इंजिन उपलब्ध झाल्यानंतर ‘तेजस एमके-1ए’चे वितरण सुरू होईल.
तेजसमध्ये 75 टक्के सामग्री स्वदेशी असली तरी इंजिनासाठीचे परावलंबित्व उत्पादन रखडण्याचे मुख्य कारण आहे. कारण आपल्याला हे इंजिन भारतात बनवता आले नाही. म्हणून काही वर्षांपूर्वी इंजिनसाठी एचएएलने अमेरिकेतील जीई एरोस्पेसशी करार केला आहे. या पंपनीमार्फत 2023-24 वर्षात 16 इंजिने दिली जाणार होती. मात्र आजवर एकही इंजिन न मिळाल्याने एचएएलला हवाई दलाच्या रोषाला तोंड द्यावे लागते. याचे मुख्य कारण अमेरिकेला भारतावर दबाव टाकायचा होता. आता मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर असे वाटते की, मार्च 2025 पर्यंत उपरोक्त पंपनीकडून एक-दोन इंजिन मिळू शकतील. यातून उत्पादनास गती मिळेल. मात्र ‘तेजस एमके – 1 ए’च्या नव्या प्रणालींचे प्रमाणीकरण झालेले नाही.
‘तेजस मार्क वन ए’ या जास्त आधुनिक उपप्रकाराच्या लढाऊ विमानांच्या निर्मितीस सुरुवात होणे अपेक्षित होते, पण 2025 साल उजाडले तरी या विमानांची पहिली तुकडी अजूनही हवाई दलात दाखल झालेली नाही. मार्च महिन्यात 11 विमाने हवाई दलात दाखल होणे अपेक्षित होते, ती तारीखही पुढे ढकलली आहे. हवाई दलाशी प्रारंभी झालेल्या करारान्वये एचएएल 83 ‘तेजस एमके-1 ए’ लढाऊ विमानांची पूर्तता पुढील साडेतीन वर्षांत करणार आहे. भारतीय हवाई दलासाठी 97 ‘एमके-1 ए’ आणि लष्करासाठी 156 हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरसाठी दोन स्वतंत्र करार पुढील काळात होण्याची अपेक्षा आहे. दुसऱ्या करारातील 97 लढाऊ विमाने 2031 पर्यंत वितरित केली जातील. हवाई दलास लढाऊ विमानांच्या 42 तुकडय़ांची गरज आहे. मंजूर क्षमतेच्या तुलनेत सध्या 31 तुकडय़ा अस्तित्वात असून पुढील काळात ‘मिग – 29’, ‘जॅग्वार’ आणि ‘मिराज – 2000’ ही विमाने निवृत्त होतील. निरोप घेणाऱ्या बहुसंख्य विमानांची जागा तेजसला देण्याचे नियोजन आहे. या परिस्थितीत तेजसच्या उत्पादनास होणारा विलंब हवाई दलाच्या लढाऊ क्षमतेवर परिणाम करेल. हवाई दलाने एचएएलच्या कामगिरीविषयी व्यक्त केलेली साशंकता गंभीर आहे. एचएएलची कामगिरी लवकर सुधारण्याची गरज आहे.