
इंडिया गॉट लेटेंट कार्यक्रमादरम्यान वादग्रस्त आणि अश्लील टिपणी केल्यामुळे यूट्यूबर रणवीर अलाहाबादीया अडचणीत आला आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात वेगवेगळ्या राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यातच आता अभिनेत्री राखी सावंतला अलाहाबादीया याचं समर्थन करणं चांगलंच महागात पडलं आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी राखी सावंतला तिचा जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावलं आहे. अलीकडेच राखी सावंतने अलाहाबादीयाला पाठिंबा देत म्हटलं होतं की, त्याला माफ करा मित्रांनो. अनेकवेळा असं होऊन जातं. मला माहित आहे की, त्याने चूक केली आहे. पण आता त्याला माफ करा.”
याआधी इंडियाज गॉट लेटेंटच्या एका भागात राखी सावंत सहभागी झाली होती. या वादात तिचे म्हणणे नोंदवण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी तिला 27 फेब्रुवारी चौकशीसाठी बोलावलं आहे. दरम्यान, समन्स मिळाल्यानंतर राखी सावंतने एक व्हिडीओ जारील केला आहे. या व्हिडीओत ती या समन्सबद्दल बोलताना म्हणाली आहे की, मला समन्स पाठवण्यात काही अर्थ नाही. ती म्हणाली की, मी एक कलाकार आहे, मला पैसे देऊन मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. मी मुलाखत दिली. मी कोणाशीही गैरवर्तन केले नाही.