
हिंदुस्थानात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात EVs स्वस्त होऊ लागल्या आहेत, ज्यामुळे त्या ग्राहकांच्या आवाक्यात आल्या आहेत. मेट्रो शहरांमध्ये राहणारे आणि दररोज 50 किलोमीटर किंवा त्याहून अधिक प्रवास करणारे लोक आता ईव्हीकडे वळत आहेत. इंडिया एनर्जी स्टोरेज अलायन्सनुसार (IESA), 2030 मध्ये हिंदुस्थानी रस्त्यांवरील ईव्हीची संख्या 2.80 कोटी पार होण्याची शक्यता आहे.
IESA च्या अहवालानुसार, 2023-2024 या आर्थिक वर्षात हिंदुस्थानात EV विक्रीचा आकडा 41 लाख युनिट्सच्या पुढे गेला आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत आणखी वाढ होण्याचे हे चांगले लक्षण आहे. पर्यावरणविषयक जागरूकता, ग्राहक हित, बॅटरी तंत्रज्ञानातील प्रगती आणि सहज उपलब्ध आणि सुलभ ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांमुळे त्यांची मागणी सतत वाढत आहे. IESA ने असेही म्हटले आहे की, असा अंदाज आहे की, वार्षिक विक्रीपैकी 83 टक्के इलेक्ट्रिक-दुचाकी वाहने असतील, 10 टक्के इलेक्ट्रिक-चारचाकी आणि ट्रक, बस यांसारखी व्यावसायिक वाहने असतील. तसेच इलेक्ट्रिक थ्री व्हीलरच्या विक्रीत 7 टक्के वाढ होऊ शकते.