रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीचे व्हिडिओ एक्सवरून हटवण्यापेक्षा रेल्वेमंत्र्यांना हटवा, आदित्य ठाकरे बरसले

दिल्लीत झालेल्या चेंगराचेंगरीचे सर्व व्हिडीओ हटवा असे आदेश केंद्र सरकारने एक्सला (पूर्वीचे ट्विटर) दिले आहेत. त्या ऐवजी रेल्वेमंत्रालय सांभाळण्यात अपयशी ठरलेल्या रेल्वेमंत्र्यांना का हटवू नये? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, माहिती तंत्रज्ञान विभागाचा गैरवापर करून आपले अपयश झाकून रेल्वेमंत्र्यांनी एक्सवरचे व्हिडीओ डीलीट करायला सांगितले आहे. आपले अपयश झाकण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी. रेल्वेमंत्रालय चालवण्यासाठी चांगल्या व्यक्तीची गरज आहे.

केंद्र सरकारला कुठलीच जबाबदारी स्वीकारायची नाही, हे यातून सिद्ध होत आहे. हा देश आता लोकशाही देश राहिलेला नाही. ही लोकशाही परत आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील, असे आदित्य ठाकरे म्हणाले.