
मुंबई महापालिकेचा सर्वात महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या रोडला तडे गेल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. कोट्यवधींचा खर्च करून बनवलेला या रोडच्या अवस्थेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर तोशेरे ओढले आहेत. मिंध्यांचे लाडके कंत्राटदार ‘रस्त्यावरचा मलिदा’ खाण्यात पटाईत आहेत, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आम्ही आधीच म्हटलं होतं, मिंधे जिथे जिथे हात लावतात तिथे तिथे कामं रखडतात, खर्च वाढतात आणि कामाची मात्र वाट लागते… मिंधे व त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ ‘रस्त्यावरचा मलिदा‘ खाण्यात पटाईत आहेत….
कोस्टल रोडवर ‘हाजीअली ते वरळीपर्यंतच्या’ रस्त्यावर केलेलं पॅचवर्क हे त्याचंच…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 21, 2025
मुंबईचा ड्रीम प्रोजेक्ट कोस्टल रोडच्या व्हायरल व्हिडिओवर आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत सरकारला धारेवर धरले आहे. आम्ही आधीच म्हटलं होतं, मिंधे जिथे जिथे हात लावतात तिथे तिथे कामं रखडतात, खर्च वाढतात आणि कामाची मात्र वाट लागते… मिंधे व त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ ‘रस्त्यावरचा मलिदा‘ खाण्यात पटाईत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
कोस्टल रोडवर ‘हाजीअली ते वरळीपर्यंतच्या’ रस्त्यावर केलेलं पॅचवर्क हे त्याचंच ढळढळीत उदाहरण आहे, असे म्हणत सरकारवर कामावर निशाणा साधला आहे. ‘आमचं सरकार असतं तर उत्तम गुणवत्तेचा कोस्टल रोड 2023 मध्येच संपूर्ण तयार झालेला असता आणि आजवर सायकल ट्रॅक्स, बागा तयार होऊन नागरिकांसाठी खुल्या झालेल्या असत्या, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.