
विशाल दादलानी हा कायम त्याच्या सडेतोड बोलण्यामुळे ओळखला जातो. नुकतेच त्याने उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. विशाल सोशल मीडियावर कायमच त्याला पटणाऱ्या आणि न पटणाऱ्या मुद्द्यांवर ठामपणे मत मांडतो. नुकतेच त्याने सध्याच्या घडीला सुरू असलेल्या महाकुंभवर परखड भाष्य केले आहे. मुख्य म्हणजे यावेळी त्याने वादग्रस्त स्टॅंड अप काॅमेडियन समय रेना आणि यूट्यूबर रणवीर अलाहबादीया यांची बाजूही घेतली आहे.
सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर त्याने स्टोरी शेअर केली असून त्याने उघडपणे समय रेना याचे समर्थन केले आहे. सरकारला मीडियावर कंट्रोल करायचा आहे. महाकुंभमधील चेंगराचेंगरीमधील मृतांचं काय झालं? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. हे सर्व केवळ इतक्यावरच थांबलं नाही तर, विशालने याहीपुढे जाऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गंगेचे पाणी शुद्ध वाटत असेल तर, ते पाणी कॅमेऱ्यासमोर पिऊन दाखवा, असा आग्रहही केला आहे.
महाकुंभ मेळ्याच्या कालावधीमध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदीच्या पाण्यातील फेकल कोलीफाॅर्मची पातळी गुणवत्ता मानकांनुसार योग्य नाही, असे म्हटले होते. संबंधित अहवालही प्रदूषण मंडळाने, एनजीटीकडे सादर केला होता. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी संगमाचे पाणी केवळ अंघोळीसाठीच नाही तर, आचमनाकरताही उत्तम असल्याचे म्हटले होते. याच वादंगावर विशाल दादलानीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कॅमेरासमोर पाणी पिण्याचे आव्हान इन्स्टाग्राम स्टोरीमधून केले आहे.