
शहरातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून कृषी सहायकाने कृषी कार्यालयातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून तालुका कृषी अधिकाऱ्यासह एकाच्या विरोधात गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश शिवराम सोनवणे असे आत्महत्या केलेल्या कृषी सेवकाचे नाव आहे.
योगेश सोनवणे यांची पत्नी विमल सोनवणे यांनी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, योगेश सोनवणे हे सिल्लोड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सेवक म्हणून कार्यरत होते. त्यांना मागील काही दिवसांपासून तालुका कृषी अधिकारी व कृषी सहायक हे दोघे संगनमत करून मानसिक त्रास व अपमानास्पद वागणूक देत. सुटीच्या दिवशी अतिरिक्त काम लावल्याने त्यांचे त्रासाला कंटाळून व त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.
तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर श्यामराव बरधे व कृषी सहायक किशोर उत्तमराव बोराडे या दोघांच्या विरोधात सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर कायंदे हे करीत आहेत.
घटनेनंतर मयत योगेश सोनवणे यांचे नातेवाईक दिवसभर सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते व या आत्महत्या मागील खरे कारण काय याचा शोध पोलिसांनी घेऊन गुन्हा दाखल करावा, अशी त्यांची मागणी होती. अखेर गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी वरील दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
योगेश सोनवणे यांच्या मृतदेहाचे सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात जैनाबाद जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.
गळफास घेण्यापूर्वी व्हिडिओ रेकॉर्डिंग
योगेश सोनवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली तेव्हा त्यांनी आत्महत्येपूर्वी स्वतःच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्यात त्यांना कार्यालयीन कामकाजाच्या दरम्यान मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भरदे व कृषी सहायक किशोर उत्तमराव बोराडे यांचे नावाचा उल्लेख केला आहे. यावरून पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.