बँक खात्यात नजरचुकीने आलेली रक्कम केली परत

सध्याच्या काळात लोकांमध्ये माणुसकी राहिलेली नाही, असं सहज बोलता बोलता बोललं जातं. परंतु, आजच्या जमान्यातही काही लोकांमध्ये हा प्रामाणिकपणा टिकून आहे. याचा प्रत्यय देवळाली प्रवरा येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या कृतीतून दिसून आलाय. स्वतःच्या बँक खात्यात नजरचुकीने 2 लाख 3 हजार 817 रुपये आलेल्या रकमेचा मोह न ठेवता संबंधिताला ही रक्कम परत करून देवळाली प्रवरा येथील मुकुंद उर्फ राजू बापूसाहेब चव्हाण यांनी कृतीतून प्रामाणिकपणा दाखवून दिला आहे.

देवळाली प्रवरा येथील रहिवासी व ताहाराबाद येथील श्री संत कवी महिपती महाराज पायी दिंडी सोहळ्याचे चोपदार आणि मुकुंद ऊर्फ राजू बापूसाहेब चव्हाण यांच्या स्टेट बँक खात्यात भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कर्मचाऱ्याकडून नजरचुकीने अशोक भोत या विमाधारकाची रक्कम ट्रान्स्फर झाली होती. दोन दिवसांपूर्वी चव्हाण हे बँकेत गेले असता, खात्यातील शिल्लक रकमेची माहिती घेतली असता, माझ्या खात्यात एवढी रक्कम नव्हती. माझ्या खात्यात एवढी मोठी रक्कम कोठून आली, असे बँक अधिकाऱ्यांना विचारले. सदर रक्कम एलआयसीकडून जमा करण्यात आल्याचे समजले. विमा कंपनीकडून तर मला काही येणे नसताना रक्कम कशी जमा झाली, याची माहिती घेण्यासाठी त्यांनी श्रीरामपूर येथील एलआयसीचे कार्यालय गाठले.

विमा महामंडळाच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार चव्हाण यांचा खातेक्रमांक अशोक भोत यांच्या विमा पॉलिसीला जोडला गेला असल्याने अशोक भोत यांची रक्कम चव्हाण यांच्या खात्यात वर्ग झाली असल्याचा खुलासा झाल्यानंतर सदर रक्कम चव्हाण यांनी परत देण्याचे ठरवले. शिवजयंतीच्या मुहूर्तावर 2 लाख 3 हजार 817 रुपयांचा धनादेश एलआयसीचे राहुरीचे उपशाखाधिकारी शिवराज जाधव, सहायक प्रशासकीय अधिकारी राजेंद्र मुसमाडे यांच्या ताब्यात देण्यात आली. यावेळी नामदेव चव्हाण, माजी नगरसेवक अजित चव्हाण, अभय चव्हाण, अनिल पठारे, बाबा सरोदे, प्रज्ञा कुलकर्णी आदी उपस्थित होते.