
सुका मेवा म्हणजे प्रथिनांचे मुबलक भांडार. सुका मेवा आपण रोज काही प्रमाणात खाल्लाच पाहिजे. यामुळे आपल्या शरीराला आवश्यक प्रथिनांचा पुरवठा होतो. म्हणूनच आरोग्याविषयी जागरूक असणारे, ड्राय फ्रूट हे नाश्त्यामध्ये खातात. ड्रायफ्रूट बद्दल आज अनेक समज गैरसमज आपल्याला पाहायला मिळतात. काहीजण म्हणतात की, रोज ड्रायफ्रूटचे सेवन करणे हे वाईट असते. परंतु तज्ज्ञ मात्र म्हणतात, योग्य प्रमाणात ड्रायफ्रूट खाणे हे केव्हाही उत्तम.
एकूणच निरोगी आरोग्यासाठी सुका मेवा हा एक बेस्ट पर्याय मानला जातो. सुका मेवा खाल्ल्यामुळे आपल्याला दिवसभर ताजेतवाने वाटते. त्याचबरोबर आपली पचनशक्तीही उत्तम राहते. सुका मेवा खाण्याचे शरीरासाठी अगणित फायदे आहेत, तेच फायदे आपण बघूया.
सुका मेवा हा मेंदूच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असल्यामुळे, सुका मेवा ब्रेन फूड म्हणूनही ओळखले जाते.
रोज योग्य प्रमाणात बदाम, पिस्ता, अक्रोड खाण्यामुळे हृद्याचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
सुक्या मेव्यात असणाऱ्या पोटॅशियममुळे आपले ब्लड प्रेशर उत्तम नियंत्रित राहते.
आहारात साखर खाण्यापेक्षा सुका मेवा खाणे हे केव्हाही उत्तम असा सल्ला वैद्यकिय तज्ज्ञही देतात.
योग्य प्रमाणात सुका मेवा आणि फळांचा समावेश आहारात केल्यास शरीर अधिक निरोगी आणि बलवान होते.
सुका मेवा खाल्यामुळे आपली पाचन शक्ती सुद्धा चांगली सुधारते. अन्न पचन होण्यासाठी सुका मेवा म्हणूनच रोज योग्य प्रमाणात खाणे गरजेचे आहे.
सुका मेवा खाल्ल्यामुळे हाडांचे आरोग्यही सुधारते. चाळीशीनंतर महिलांना अनेक हाडांच्या व्याधीने ग्रासले जाते. अशावेळी सुका मेवा खाणे हे केव्हाही हितकारक आहे.
त्वचेचे आरोग्यही सुका मेवा खाल्ल्यामुळे खूप सुधारते. त्वचेला आवश्यक पोषण तत्व ही सुक्या मेव्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात.
(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)