राजकारणात मतभेद असावेत, मात्र व्यक्तिगत सलोखा कधी विसरू नये : शरद पवार

राजकारणात मतभेद, मतभिन्नता नक्कीच असू शकते, मात्र राजकारण्यांनी व्यक्तिगत सलोखा कधीही विसरू नये, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी दिल्लीत केले. तर शरद पवार हे महाराष्ट्राचे, देशाचे आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक असल्याची भावना शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला दैनिक ‘सामना’चे दिल्ली ब्युरो चीफ पत्रकार नीलेशकुमार कुलकर्णी लिखित ‘संसद भवन ते सेंट्रल विस्टा-आठवणींचा कर्तव्य पथ’ या पुस्तकाचे प्रकाशन आज दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी शरद पवार बोलत होते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या दिलखुलास मैत्रीचे आणि त्यांच्या दिलदारपणाचे दाखलेही त्यांनी यावेळी दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही त्यांनी गौरवोद्गारही काढले.

पुस्तक प्रकाशनप्रसंगी कुलकर्णी यांच्या पुस्तकाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. स्वातंत्र्य आणि नंतरच्या काळाचा मोठा ठेवा या पुस्तकात आहे. संसदेची ही इमारत इतिहासाची साक्षीदार आहे. जुन्या संसदेचे बांधकाम आर्टिस्ट एडविन लुट्येन यांनी केले होते. ही देखणी वास्तू अंतःकरणात ठसलेली वास्तू असून तीच वास्तू आपलीशी वाटते, असेही शरद पवार म्हणाले. तर यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मी गेल्या अनेक वर्षांपासून दररोज लिहितो. कुठेही लिहितो. विमानात, कारमध्ये असलो तरी लिहितो, मात्र पुस्तक लिहिणं इतपं सोपं नाही. यावेळी शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, प्रकाशक प्रशांत अनासपुरे, लक्ष्मीकांत खाबिया उपस्थित होते.

… आणि मुंबईची परिस्थिती सावरली

महाराष्ट्रात मोठी दंगल झाली. मुंबईत पेटली होती. पंतप्रधानांनी मला बोलून घेतले. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते, मात्र मला महाराष्ट्रात पाठविण्याचा निर्णय झाला. जर मुंबईच टिकली नाही तर कशासाठी राजकारण करायचे, हा विचार केला आणि मग मी मुंबईत गेलो आणि परिस्थिती सावरली गेली, अशी आठवणही शरद पवार यांनी सांगितली.