
मुंबईतील नशेबाजांसाठी दोघे ड्रग्ज तस्कर एमडीचा साठा घेऊन बुधवारी रात्री दादर पूर्वेकडे आले होते. तेथील एका गेस्ट हाऊसमध्ये खोली घेऊन तेथे दोघेही थांबले होते. योग्य संधी बघून तेथून ते सटकणार होते. पण अगदी वेळेत पोलीस निरीक्षक दया नायक त्यांच्या पथकासह त्या खोलीवर धडकले आणि दोन्ही तस्कर लटकले. पोलिसांनी त्यांच्याकडून 5 किलो 40 ग्रॅम वजनाचा व 10 कोटी 8 लाख रुपये किमतीचा एमडीचा साठा जप्त केला.
दोन ड्रग्ज तस्कर एमडीचा साठा विक्रीसाठी दादर येथे घेऊन येणार असल्याची खबर युनिट-9 चे प्रभारी निरीक्षक एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मिळाली. त्यानुसार दया नायक यांनी त्यांच्या खबऱ्यांना कामाला लावून त्या दोघांचा माग काढण्यास सांगितले. अखेर ते दोघे दादर पूर्वेकडील स्वामिनारायण मंदिरालगत असलेल्या समर गेस्ट हाऊसमध्ये आले असल्याचे कळताच दया नायक त्यांच्या पथकासह तेथे धडकले.
दोघेही तेथून पळून जाऊ नये याकरिता पद्धतशीर सापळा रचून ते थांबले होते त्या 309 क्रमांकाच्या खोलीवर गेले आणि जहांगीर शहा आलम शेख (29) आणि सिनाऊल जुलूम शेख (28) अशा दोघांना तेथून उचलले. या दोघांनी हे ड्रग्ज कुठून आणले आणि ते पुढे कोणाला विकणार होते याचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून युनिट-9 ते गुह्याचा तपास त्यांच्याकडे घेतला आहे.