
मंगळवार पेठेतील ससून हॉस्पिटल समोरील रस्ते विकास महामंडळाचा सुमारे 400 कोटी रुपयांचा भूखंड 60 कोटी रुपयांमध्ये बिल्डरच्या घशात घातल्याप्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तरावरून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे महायुतीमधील बड्या मंत्र्याच्या आशीर्वादाने खिरापतासारखा वाटण्यात आलेला हा भूखंड मुख्यमंत्री काढून घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या भूखंडाच्या डीलमध्ये राज्यातील काही वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी देखील स्लीपिंग पार्टनर असल्याची चर्चा आहे.
सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मालकीचा आणि त्यानंतर 1998 मध्ये रस्ते विकास महामंडळाला एक रुपया नाममात्र भाडे तत्त्वावर 99 वर्षांच्या कराराने दिलेला एकूण 8900 चौरस मीटर क्षेत्र असलेला हा भूखंड आहे.