दृश्यम- 3 लवकरच येणार, साऊथ सुपरस्टार मोहनलालची घोषणा!

मल्ल्याळम भाषेतील सुपरस्टार म्हणून मोहनलालची ओळख सर्वज्ञात आहे. दृश्यमचे दोन भाग याआधी साऊथमध्ये प्रदर्शित झाले होते. हे दोन्ही भाग सुपरहिट झाल्यामुळे आता दृश्यमचा पुढचा भाग कधी येणार अशी उत्सुकता सर्व प्रेक्षकांना होती. नुकतेच या चित्रपटाचा तिसरा भाग येणार असल्याचे, साऊथचे सुपरस्टार मोहनलाल यांनी प्लॅटफाॅर्म एक्सवरून सांगितले.

सोशल मीडीयावर त्यांनी दृश्यमच्या निर्मात्यांसोबत फोटो शेअर केलेला असून, ”The Past Never Stays Silent” असेही म्हटले आहे. क्राईम थ्रिलर असलेल्या दृश्यम या सिनेमाने मल्ल्याळम सिनेमासृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेले होते. साऊथच्या या चित्रपटाचा हिंदी भाषेसह तमिळ, तेलगू, कन्नड,सिंहली आणि चिनी भाषेत रिमेक झाला होता. मोहनलाल यांनी ही पोस्ट केल्यानंतर, अवघ्या काही तासांमध्येच चाहत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे दृश्यम- 3 च्या भागामध्ये काय थ्रिलर पाहायला मिळणार याकरता प्रेक्षक उत्सुक आहेत.

2013 साली दृश्यम सर्वात आधी मल्ल्याळमध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट ब्लाॅकबस्टर हिट झाल्यानंतर इतर अनेक भाषांमध्ये आला. दृश्यम चित्रपटाचा दुसरा भाग यायला जवळपास आठ वर्षे जावे लागली. त्यानंतर आता तिसऱ्या भागाची घोषणा झाल्यामुळे मोहनलालचे चाहते खूप खुष आहेत. दृश्यम- 3 चे दिग्दर्शन जीतू जोसेफ करणार आहेत. जीतू जोसेफ यांनीच पहिल्या दोन भागांचे दिग्दर्शन केले होते. त्यामुळेच आता पुन्हा एकदा मोहनलाल आणि जीसू जोसेफ यांची भट्टी कशी रंगणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.