
प्रयागराज येथे महाकुंभदरम्यान मौनी अमावस्येला अमृत स्नानाआधी चेंगराचेंगरीची घटना घडली होती. यामध्ये 30 जणांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र अजूनही मृतांचा खरा आकडा उत्तर प्रदेश सरकारकडून जाहीर करण्यात आलेला नाही. यातच आता अनेक असे पीडित कुटुंबीय आहेत, जे समोर येऊन आपलं दुःख सांगत सरकारविरोधात रोष व्यक्त करत आहेत. यात अनेक लोक असे आहेत ज्यांनी आपल्या कुटुंबीयांतील सदस्यांना या चेंगराचेंगरीच्या घटनेत गमावलं. यातच अनेक मृतांची नोंद सरकारी यादी करण्यात आली नसून त्यांच्या कुटुंबियांना कुठल्याही प्रकारची भरपाई सरकारच्या वतीने देण्यात आलेली नाही.
‘मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला, मात्र सरकार यादीत नावच नाही’
कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत प्रयागराज येथील रहिवासी सौम्या श्रीवास्तव यांची आई नीलम श्रीवास्तव यांचा मृत्यू झाला होता. याबाबत आपलं दुःख व्यक्त करत सौम्या श्रीवास्तव म्हणाल्या की, ”आई कुंभमेळ्यात स्नान करायला गेली होती. चेंगराचेंगरीत तिला आपला जीव गमवावा लागला. सरकारकडून मृतदेह मिळाला. त्यावर 5 हा आकडा लिहिलेला होता. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. अंत्यसंस्काराच्या वेळी एक पोलीस हवालदारही उपस्थित होता. असे असूनही, सरकारने जाहीर केलेल्या 30 मृतांच्या यादीत आईचे नाव नव्हते. यामुळे आम्हाला ना कोणतीही भरपाई मिळाली, ना कोणतीही सरकारी मदत.”
याचबद्दल आपलं दुःख व्यक्त करत नीलम श्रीवास्तव यांचे पती केसी श्रीवास्तव यांनी सांगितलं की, ”त्या संध्याकाळी जेव्हा सरकारने मृतांची यादी जाहीर केली तेव्हा माझ्या पत्नीचे नाव त्यात नव्हते. माझ्या पत्नीला चेंगराचेंगरीत जीव गमवावा लागला, याचे मला खूप दुःख आहे. प्रशासनाने मृतदेहाचा पंचनामाही केला, परंतु त्यांच्या आकडेवारीत समाविष्ट केला नाही. आम्ही सर्वांना सांगतो की, माझीपत्नी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडली, पण सरकार त्यावर विश्वास ठेवत नाही.”