अदानीचा विरोध झुगारून मुंबई विमानतळावर दणक्यात शिवजयंती, लोकाधिकार समितीचा हिसका

अदानी व्यवस्थापनाचा विरोध झुगारून शिवसेनेच्या एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीने आज मुंबई विमानतळावर शिवजयंती उत्सव दणक्यात साजरा केला. व्यवस्थापनाने शिवजयंती साजरी करण्यास आडकाठी आणली होती; परंतु लोकाधिकारच्या कार्यकर्त्यांनी ती झुगारून शिवजयंती साजरी केली.

एअर इंडिया डोमेस्टिक कार्गो येथे एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीने 1987 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता, मात्र मुजोर अदानी व्यवस्थापनाने तो काढून बाजूला ठेवला होता. लोकाधिकारच्या कार्यकर्त्यांनी तो पुतळा पुन्हा पूर्वीच्या जागी स्थापन केला. त्यानंतर अदानी व्यवस्थापनाने पुतळ्याकडे जाणाऱया मार्गावर पत्रे लावून पुतळा बंदिस्त केला व अटकाव करण्याचा प्रयत्न केला. शिवजयंतीसाठी अटी घातल्या. मात्र त्या लोकाधिकार समितीने हाणून पाडल्या. समितीचे सह-सरचिटणीस प्रवीण शिंदे, लोकाधिकार महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर, उपाध्यक्ष प्रदीप बोरकर, प्रशांत सावंत आणि भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आज धडक दिली. आणि त्यांनी व्यवस्थापनाचा विरोध झुगारून आत घुसून शिवजयंती साजरी केली.

अदानीची पैशाची मस्ती कदापि सहन करून घेतली जाणार नाही व शिवपुतळय़ाची योग्य ठिकाणी पुनर्स्थापना करून दिली नाही तर अदानी व्यवस्थापनाला योग्य तो धडा शिकवला जाईल, असा इशारा यावेळी प्रदीप मयेकर यांनी दिला. यावेळी लोकाधिकार महासंघ आणि महासंघाशी संलग्न समित्यांचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मुंबई विमानतळ येथे शिवजयंती साजरी करण्यात येणार असे अदानी व्यवस्थापनाला लोकाधिकार समितीने पत्र दिले होते, परंतु व्यवस्थापनाने पोलीस आणि बाऊन्सर्सची मदत घेतली. पुतळ्याजवळ फक्त चार जणांनाच मोबाईल फोन पोलिसांकडे जमा करून जावे लागेल अशी सक्ती केली. ही सक्ती समितीने झुगारून लावली.