शिवरायांचे किल्ले हीच आमची मंदिरे गडांवरील सर्व अतिक्रमणे हटवणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीच्या मावळय़ांना एकत्र करून रयतेचे राज्य निर्माण केले. शिवरायांनी उभारलेले गडकिल्ले केवळ वास्तू नसून सर्वांना प्रेरणा आणि जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा आहे. परंतु त्यातील अनेक गडकिल्ल्यांना अतिक्रमणांचा वेढा पडला आहे. बेकायदा बांधकामांनी किल्ल्यांचे विद्रुपीकरण झाले आहे. आता ती सर्व अतिक्रमणे दूर होणार आहेत. शिवरायांचे किल्ले हीच आमची मंदिरे असून गडकिल्ल्यांवरील सर्व अतिक्रमणे हटवली जातील, अशी मोठी घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवजयंतीच्या मुहूर्तावर किल्ले शिवनेरी येथे केली. राज्यभरात आज शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी झाली. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने अवघा महाराष्ट्र दुमदुमला.

शिवजयंतीसाठी संपूर्ण शिवनेरीवर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. देशभरातून आलेल्या शिवभक्तांनी यावेळी दिलेल्या ‘जय भवानी, जय शिवराय’ घोषणांनी किल्ले शिवनेरी दुमदुमला. पोलीस बँड पथकाने राज्यगीताची धून वाजवून सलामी दिली. पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. शिवजन्मोत्सव सोहळय़ात सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे व अन्य मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी माजी आमदार बाळासाहेब दांगट, डॉ. अमोल डुंबरे, जालिंदर कोरडे आणि राजाभाऊ पायमोडे यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘शिवनेरी भूषण’ पुरस्काराने सन्मानित केले.

12 गडकिल्ल्यांची ‘युनेस्को’च्या नामांकनासाठी निवड

शिवरायांचे 12 गडकिल्ले ‘युनेस्को’ वारसास्थळ नामांकनासाठी निवडले आहेत. ते गडकिल्ले स्थापत्यशास्त्र, जलसंवर्धन, पर्यावरणशास्त्राचा उत्तम नमुना असल्याने पॅरिस येथील महासभेत येत्या आठवडय़ात त्याबाबत सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

z किल्ले शिवनेरीसह स्वराज्याची राजधानी रायगड तसेच इतर गडकिल्ल्यांवर संवर्धनाची कामे सुरू आहेत. साडेतीन शतकांनंतरही हे गडकिल्ले शिवकाळातील पराक्रमाची साक्ष देत आहेत, परंतु कालौघात अनेक गडकिल्ल्यांवर बेकायदा बांधकामे झाली. मध्यंतरी विशाळगडावरील अतिक्रमणांवरून मोठा वादही पेटला होता. अशी अतिक्रमणे हटवण्याबरोबरच ती पुन्हा उद्भवू नयेत म्हणून विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
z शिवछत्रपतींनी देव, देश आणि धर्मासाठी बलाढय़ शत्रूशी लढा देऊन स्वराज्य स्थापन केले. पाच वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा 400 वा शिवजन्मोत्सव शासनातर्फे मोठय़ा आणि दिमाखदार स्वरूपात साजरा केला जाईल, अशी ग्वाहीही फडणवीस यांनी यावेळी दिली. छत्रपती शिवाजी महाराज उत्तम प्रशासकदेखील होते. पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन आणि इतर व्यवस्थापनाचे जनक शिवाजी महाराज होते. त्यामुळे त्यांना आदर्श राजा, जाणता राजा म्हटले जाते, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

शिवरायांचे ताजमहालपेक्षा भारी स्मारक उभारणार, आग्रा किल्ल्यावर फडणवीसांनी घेतली आईची शपथ

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना बंदी ठेवण्यात आले होते ती जागा उत्तर प्रदेश सरकारने आम्हाला द्यावी, त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकार ताज महालपेक्षाही भव्य असे शिवरायांचे स्मारक उभारेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आग्रा किल्ल्यावरील शिवजयंती सोहळ्यात केली. आईशपथ सांगतो, एकदा हे स्मारक झाले की ताजमहाल पाहण्यासाठी गर्दी होते त्यापेक्षाही जास्त लोक हे स्मारक पाहण्यासाठी येतील. हे माझे शब्द खरे ठरले नाहीत तर मी देवेंद्र फडणवीस हे नाव लावणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

शिवराय संचलनाची तयारी जोरात

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्यावतीने 7 मार्च रोजी फोर्ट येथे शिवराय संचलन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी नुकतेच शिवसेना भवनात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे.

शिवनेरीवर शिवजन्मस्थळी पाळणा जोजवून शिवजन्म सोहळा पार पडला. मऱ्हाटमोळ्या पेहरावातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायला. त्यापूर्वी शिवाई देवी मंदिरात अभिषेक करण्यात आला. तर ‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी काwशल रायगडावर शिवराय चरणी नतमस्तक झाला.

किल्ले शिवनेरीवर मधमाशांच्या हल्ल्यात 20 शिवभक्त जखमी

किल्ले शिवनेरीवर आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मधमाशांचे मोहोळ उठले. तब्बल 15 ते 20 शिवभक्तांना मधमाशांनी चावा घेतला. जखमींमध्ये काही जण शिवभक्त आहेत तर काही जण आरोग्य विभागातील कर्मचारी असून काही जखमींमध्ये वन विभागाच्या कर्मचाऱयांचादेखील समावेश आहे.

किल्ले शिवनेरीवर मधमाशांनी चावा घेतलेल्या काही रुग्णांवर गडावरच उपचार करण्यात आले. तर काही रुग्णांना जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सरदे व वन विभागाचे वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी सांगितले की, चावा घेतलेल्या रुग्णांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना कोणताही मोठा धोका नाही. गेल्या वर्षीही शिवजयंतीच्या दिवशी मधमाशांनी शिवभक्तांवर हल्ला केला होता तर 13 मार्च रोजी शिवनेरीवर मधमाशांच्या हल्ल्यात 80 पर्यटक जखमी झाले होते.