
फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन दडपण्याचा मोठा कट रचला असून दोन मंत्र्यांच्या मदतीने नवे समांतर आंदोलन उभारण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. यासंदर्भात संबंधित दोन मंत्र्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून ही माहिती आपल्याला दोन पैकी एका मंत्र्यानेच दिल्याचा गौप्यस्फोटही जरांगे यांनी केला.
शिवजयंती महोत्सवात सहभागी होण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आज धाराशिव येथे आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला. मराठा आरक्षण आंदोलन दडपण्याचा भयंकर कट रचण्यात आला असून सरकारमधील दोन मंत्री नवे समांतर आंदोलन उभारणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही मंत्र्यांशी चर्चाही केली आहे. 12 ते 13 दिवस उपोषण करायचे त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घ्यायची आणि आरक्षणासंबंधी निर्णय घ्यायचा असा हा कट असल्याचे मनोज जरांगे म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारपर्यंत हैदराबाद, मुंबई आणि सातारा गॅझेट लागू करतील असा विश्वासही मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. शिंदे समितीकडे हा गॅझेटचा विषय सात महिन्यांपासून आहे आणि या विषयावर अभ्यास झाला आहे. त्यामुळे निर्णय घेण्यास कोणतीही अडचण नसावी, असे ते म्हणाले.
एफआयआरमध्ये छेडछाडीची भीती
मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्या भेटीमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये छेडछाड होण्याची भीती मनोज जरांगे यांनी व्यक्त केली. या हत्या प्रकरणातील एकही आरोपी जर सुटला तर सरकारला फार मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.