Mahakumbh 2025: महाकुंभसाठीच्या विशेष रेल्वेला आता दोन्ही बाजूंनी इंजिन, वाचा काय आहे डबल इंजिनचं कारण

चलो महाकुंभ ( Mahakumbh 2025 ) म्हणत उत्तर प्रदेशने केलेल्या निवेदनाला भाविकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. महाकुंभला जाण्यासाठी रेल्वेने 13 हजारांपेक्षा जास्त कुंभ स्पेशल गाड्या सोडल्या आहेत. असे असतानाही या ट्रेनची संख्या अपूरी पडताना दिसत आहे. महाकुंभसाठी भाविकांचा जनसागर दिवसागणिक अधिक वाढत आहे. प्रयागराजला जाणाऱ्या सर्व ट्रेन त्यामुळे, गर्दीने ओसंडून वाहात आहेत. या सर्व घडामोडीत रेल्वेने दोन्ही बाजूला इंजिन असलेल्या ट्रेन आता चालवायला सुरुवात केली आहे. म्हणजेच एक इंजिन रेल्वेच्या पुढच्या बाजूला दुसरे रेल्वेच्या मागच्या बाजूला. ही डबल इंजिनवाली ट्रेन त्यामुळे आता चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय बनलेली आहे.

प्रयागराजमध्ये रोज दाखल होणारी गर्दी पाहता रेल्वेकडून एसी तसेच जनरल कोच दाखल करण्यात आले आहेत. पण हे दोन्ही कोच मर्यादेपेक्षा जास्त गर्दीने ओसंडून वाहात आहेत. सध्याच्या घडीला रेल्वेने 13 हजारांपेक्षा जास्त ट्रेन चालवल्या असून, यातील काही ट्रेन या डबल इंजिनवाल्या दाखल करून रेल्वेने नामी शक्कल लढवली आहे. रेल्वेकडून काही ट्रेन्सना डबल इंजिन लावल्यामुळे या ट्रेन्स कुतूहलाचा विषय बनू लागल्या आहेत.

डबल इंजिनच्या ट्रेन या प्रवाशांसोबत सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र बनल्या आहेत. एका ट्रेनला डबल इंजिन लावल्यामुळे ही ट्रेन परत येताना इंजिन बदलण्याची वेळ येत नाहीये. त्यामुळे ट्रेन पुढच्या प्रवासाला निघण्यासाठी लगेच तयार असते. त्यामुळे इंजिन बदलण्यासाठी लागणारा वेळेचा अपव्यय आता होत नसताना दिसत आहे. ट्रेनचं इंजिन हे दुसऱ्या बाजूला लावताना वेळ जात असल्याकारणाने रेल्वेने ही नामी शक्कल लढवली आहे. म्हणजे यामुळे वेळेचा अपव्यय होणार नसल्याने, प्रवाशांनाही ईप्सित स्थळी लगेच पोहोचता येईल. शिवाय यामुळे गर्दीवर नियंत्रण राखता येईल, आणि ट्रेनही उशिरा सुटणार नाही.