करबुडव्या साडेनऊ हजार ठाणेकरांचे पाणी कापले, पालिकेची धडक कारवाई; दोन हजार मोटरपंप जप्त

महापालिकेचे पाणी पिण्यासाठी वापरूनही बिल न भरणाऱ्या ‘ठकसेनां’ची संख्या वाढू लागली आहे. अशा करबुडव्या साडेनऊ हजार ठाणेकरांचे पाणी कापले असून 2024 मोटरपंप जप्त केले आहेत. तसेच 540 पंप रूम सील केले आहेत. पाणीपट्टी थकवणाऱ्यांविरोधात यापुढेही कारवाई सुरूच ठेवण्याचा निर्धार ठाणे महापालिकेने केला आहे. दरम्यान पाणी बिलांच्या वसुलीने शंभर कोटींचा टप्पा गाठला असून एकूण रकमेपैकी 106 कोटींची वसुली करण्यात यश आले आहे.

ठाणे शहर झपाट्याने वाढत असून नळकनेक्शनच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. 25 लाखांहून अधिक संख्या असलेल्या शहराला सध्याचे पाणी अपुरे पडत आहे. एकीकडे पाणी पुरवठ्यात वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे करबुडव्यांविरोधात प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या पाणी बिलाची रक्कम सुमारे 225 कोटींच्या घरात आहे. त्यापैकी 76 कोटी एवढी थकबाकी असून चालू वर्षाच्या बिलाची रक्कम 148 कोटी आहे. एकूण बिलाच्या रकमेपैकी आतापर्यंत 106 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

पाणी बिलाच्या वसुलीत हयगय करणारे अभियंता तसेच लिपिक यांच्यावर शिस्तभंगाची आणि वार्षिक वेतनवाढ रोखण्याची कारवाईदेखील केली जाणार असल्याचा इशारा उपनगर अभियंता (पाणीपुरवठा) विनोद पवार यांनी दिला आहे.

थकीत पाणी बिल पूर्णपणे भरल्यास प्रशासकीय आकारामध्ये शंभर टक्के सूट ग्राहकांना देण्यात आली आहे. ही योजना 31 मार्चपर्यंत लागू राहणार असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

पाणी बिलाच्या वसुलीसाठी ठाणे महापालिकेने माजिवडा, मानपाडा, नौपाडा, वर्तकनगर, कळवा, उथळसर, दिवा, लोकमान्य-सावरकरनगर, मुंब्रा, वागेळे अशा क्षेत्रांमध्ये विशेष मोहीम सुरू केली आहे. बिल थकवणाऱ्यांचे कनेक्शन तोडण्यात आले असून ही नळजोडणी पुन्हा परस्पर केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रभागनिहाय खंडित नळ कनेक्शन

माजिवडा व मानपाडा – 176, नौपाडा व कोपरी 529, वर्तकनगर- 219, कळवा- 1346, उथळसर- 435, दिवा- 1611, लोकमान्य व सावरकरनगर- 734, मुंब्रा- 3137, वागळे-1416.