
बदलापूर गावाच्या वेशीवर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झाले. मात्र हा सरकारी कार्यक्रम असतानादेखील मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवत अघोषित बहिष्कारच टाकला. दरम्यान या कार्यक्रमात भाजप आमदार किसन कथोरे यांनी बदलापूरला एमएमआरडीएकडून निधी देताना कशी सापत्न वागणूक मिळते याचा पाढाच वाचला. यावर फडणवीस यांनी नगरविकास व एमएमआरडीएच्या विभागातील कामे कशी मार्गी लावायची हे मी पाहतो, असे सांगत एक प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले.
रायगड, नाशिकच्या पालकमंत्री पदावरून मुख्यमंत्र्यांनी अद्याप निर्णय न घेतल्याने मिंधे गट भाजपवर नाराज आहे. त्यातच आपत्ती व्यवस्थापन समितीत आधी डच्चू दिल्याने शिंदे रुसून बसल्याची चर्चा असतानाच आज बदलापुरातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला मिंधे गटाच्या एकाही पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली नाही. बदलापूर पश्चिमेकडील उल्हास नदीजवळ बदलापूर गावच्या वेशीवर पालिकेने शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारला आहे.
फडणवीसांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण होत असताना मिंधे गटाच्या येथील पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमावर अघोषित बहिष्कारच टाकल्याचे पाहायला मिळाले. त्यातच आमदार किसन कथोरे यांनी फडणवीसांच्या समोर बदलापूरला शिंदेंच्या एमएमआरडीएकडून निधी देताना कशी सापत्न वागणूक मिळते, याचा पाढाच वाचत अनेक प्रकल्प रखडल्याची माहिती दिली. हा धागा पकडत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखालील खात्यातील कामे कशी लवकर मार्गी लागतील हे मी पाहतो, असे सांगत एक प्रकारे मिंधे गटाला आव्हानच दिले.