
अलिबाग-वडखळ मार्गावरील तीनविरा धरणाजवळ सोने व्यापाऱ्यावर पडलेल्या दीड कोटी रुपयांच्या दरोड्यात मिंध्यांचे आमदार महेंद्र दळवी यांचे नाव येताच या प्रकरणाचा तपास अचानक थंडावला आहे. दरोड्याचा मुख्य सूत्रधार आणि आमदार दळवी यांचा हरकाम्या समाधान पिंजारी याने या दरोड्यात आमदार दळवींनी मदत केल्याची कबुलीजबाब देऊन चार दिवस उलटले तरी दळवींची साधी चौकशीही करण्यात आलेली नाही. याप्रकरणी पोयनाड पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का, अशी उघड चर्चा रायगडात सुरू झाली आहे.
नागपूर येथील सोने व्यापारी नामदेव हुलगे यांची आमदार दळवींचा हरकाम्या समाधान पिंजारी याने लूट केली. या दरोड्याचा गेम प्लॅन त्याने आधी दळवींना सांगितला. या दरोड्यासाठी दळवी यांनी स्वतःचे दोन सरकारी पोलीस बॉडीगार्डही दिले. समाधान पिंजारी आणि दळवींचा आणखी एक नोकर दीप गायकवाड या दोघांनी हुलगे यांची शिताफीने लूट करून दरोड्यातील दीड कोटींची रक्कम थेट आमदार दळवींच्या घरी नेली.
पोयनाड पोलिसांनी या दरोड्याची तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांनी दळवींचा हरकाम्या समाधान पिंजारीसह दळवींचे दोन बॉडीगार्ड, आणखी एक नोकर यांच्यासह सहा जणांना अटक केली. पिंजारीच्या 6 फेब्रुवारीच्या जबाबात आमदार दळवी यांचे नाव आले आणि या प्रकरणाचा तपास अचानक थंडावला. पिंजारीच्या जबाबाला 13 दिवस उलटून गेले तरी एकदाही पोलिसांनी आमदार दळवी यांची चौकशी केलेली नाही. दरम्यान समाधान पिंजारी याने दिलेल्या जबाबानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी दरोडा घालण्यासाठी मदत केल्याचे उघड झाले. परंतु यावर महेंद्र दळवी यांनी चकार शब्दही काढलेला नाही. एरवी राजकीय घडामोडींवर पत्रकार परिषदा आणि जाहीरसभांतून स्वतःची बाजू मांडणारे दळवी यावर का बोलत नाहीत, असाही सवाल यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
दळवींना वाचवण्याची धावाधाव सुरू आहे का?
दळवींचे नाव जबाबात येण्याआधी या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगात झाला, पण दळवींचे नाव या दरोडा प्रकरणात येताच तपास थंड बस्त्यात का गेला? अलिबाग पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का? की मस्साजोग प्रकरणातील वाल्मीक कराडच्या ‘आका’ला वाचवण्यासाठी जशी धावाधाव सुरू आहे तसा दळवींना वाचवण्यासाठी त्यांचा ‘आका’ पोलिसांवर दबाव आणत आहे का, अशा उलटसुलट प्रतिक्रिया अलिबागसह रायगड जिल्ह्यात सुरू आहेत.