
‘गेम किंग’ या ऑनलाईन जुगाराच्या चक्रव्यूहात रायगडातील अनेक तरुण अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालकांनीच आपल्या मुलांनी या जुगाराच्या नादात कशी लाखो रुपयांची बरबादी केली आहे. याची आपबिती सांगितली असून सरकारने या ‘गेम किंग’वर तत्काळ बंदी आणावी यासाठी टाहो फोडला आहे. या जुगारामुळे कोणी घर, कोणी दागिने, तर कोणी घरातील पैसे चोरून जुगारात घालवले असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.
‘गेम किंग चक्री’ नावाच्या ऑनलाईन जुगारात जिल्ह्यातील तरुण बेमालूमपणे गुरफटत चालला आहे. रोहा तालुक्यातील खारपटी गावातील रहिवासी नरेश डोळकर यांनी त्यांच्या मुलाने ऑनलाईन जुगाराच्या नादी लागून घरातील दागिने गहाण टाकले, तसेच गाडी विकल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर माझ्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी ठेवलेले एक लाख रुपयेदेखील जुगारात उडवल्याचे ते म्हणाले.
आतापर्यंत चार-पाच लाख रुपये या मुलाने ऑनलाईन जुगाराच्या वेडापायी गमावले असल्याचे डोळकर सांगतात. नरेश डोळकर म्हणतात, माझा मुलगा तर ‘गेम किंग चक्री’ या जुगाराच्या आहारी गेलाच आहे, पण अन्य पालकांनी सावध व्हावे, यासाठी आपण रोहा पोलिसांकडेदेखील दाद मागण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांचे फारसे सहकार्य मिळाले नाही, अशी खंतही डोळकर यांनी व्यक्त केली.
झटपट पैसे कमावण्याच्या नादात मातेरे
एका महिलेने तिचा पती ‘गेम किंग’ या ऑनलाईन जुगाराच्या आहारी गेला असून, त्याने घर बांधण्यासाठी जमा केलेले पैसे गमावल्याचे सांगितले. अशाच पद्धतीने अनेक तरुणांनी या जुगारात आपल्या आयुष्याचे मातेरे केले आहे. कुठलीही मेहनत न करता झटपट श्रीमंत होण्याचा नादात अनेक तरुण या ‘गेम किंग’ व्हिडीओचा खेळ खेळण्यात ओढले जात आहेत. रायगड जिल्ह्यात हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे.