पोलीस डायरी – सत्ताधारीच बँका लुटत आहेत

प्रभाकर पवार
[email protected]

न्य इंडिया सहकारी बँकेच्या कामकाजात अनियमितता व बँक तिजोरीतील करोडो रुपये गायब झाल्याचे आढळून आल्यावर रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी नुकतेच आर्थिक निर्बंध लागू केले ही बातमी वाऱ्यासारखी प्रत्येक बँक खातेदारापर्यंत पोहोचली आणि मुंबईतील अंधेरी, बोरिवली, वांद्रे, चेंबूर, घाटकोपर, गिरगाव, नरिमन पॉइंट, कांदिवली, मालाड, सांताक्रुझ, वर्सोवा, नवी मुंबई, ठाणे, मीरा रोड, पालघर, वसई, विरार, पुणे आदी भागांतील बँकांच्या बाहेर खातेदारांची गर्दी उसळली.

सर्वसामान्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बँकेला 57 वर्षांचा इतिहास असताना या बँकेत गैरव्यवहार झालेच कसे? बँकेला टाळे ठोकण्याची वेळ आली कशी? बँक कर्मचाऱ्यांनी दोन-तीन वर्षांपूर्वी बँकेतील आर्थिक घोटाळा रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आणलेला असतानाही रिझर्व्ह बँकेने त्याकडे का दुर्लक्ष केले? असा सवाल खातेदार करीत आहेत. बँक बुडाल्याचे लक्षात आल्यावर असंख्य खातेदारांच्या जीवनात अंधार पसरला आहे. बँकेत जमा केलेल्या ठेवी आपणास परत मिळतील की नाही, याची आता खात्रीच राहिलेली नाही. कुणाच्या मुलांची लग्नं जवळ आली होती, कुणाला हक्काचे घर घ्यायचे होते. त्यावर आता पाणी पडले आहे. तरीही खातेदारांनी उमेद सोडलेली नाही. त्यांनी रस्त्यावर येऊन लढण्याची तयारी दाखविली आहे.

न्यू इंडिया सहकारी बँकेचा जनरल मॅनेजर व हेड अकाऊंटंट हितेश प्रवीणचंद्र मेहता (वय वर्षे 57. राहणार आर्यवर्ता एन. एल. कॉम्प्लेक्स, दहिसर पूर्व) हाच बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असून तूर्त तरी या लफंग्याने प्रभादेवी व गोरेगाव शाखेतील 122 कोटी रुपयांची तिजोरीतील रोकड चोरल्याचे उघडकीस आले आहे. त्यातील 70 कोटी रुपये मेहता याने बांधकाम व्यावसायिक धर्मेश जयंतीलाल पौन (वय वर्षे 58, राहणार कांदिवली प.) याच्याकडे, तर 40 कोटी अरुणभाईला कर्जाऊ दिले असल्याचे उघड झाल्याने मुंबई गुन्हे शाखेच्या (आर्थिक घोटाळा विभाग) अधिकाऱ्यांनी पौन यालाही अटक केली आहे तर अरुणभाई अद्याप सापडला नाही.

कुंपणच शेत खात आहे याचा आपणास रोज अनुभव येत आहे आपल्या देशात रोज किमान 100 कोटी रुपयांचे बँक घोटाळ्यात नुकसान होत आहे त्यात महाराष्ट्रात सर्वात जास्त बँक घोटाळे होत असल्याचे समोर आले आहे. या घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असतो असेही पोलीस तपासात उघड होत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भांडुप शाखेतील मनोज मारुती म्हस्के (वय वर्षे 33) याने ऑनलाइन जुगारात हरल्याने त्याने बँकेच्या लॉकरमधील खातेदारांचे 3 कोटी रुपयांचे दागिने अलीकडे चोरले व फरीद शेख या मध्यस्थाला विकले. भांडुप पोलीस ठाण्याचे फौजदार अभिजीत टेकवडे यांनी चौकशी करून म्हस्के व शेख यांना अटक केली.

खातेदार सक्रिय नसेल, आर्थिक उलाढाल वर्षानुवर्षे होत नसेल तर बँकेतील फ्रॉड अधिकारी खातेदाराची चौकशी करतात. खातेदार मयत झाला असेल, त्याला वारस नसेल किंवा असला तरी त्याला न कळवता बनावट वारस व खोटे कागदपत्र सादर करून मयत बँक खातेदाराच्या खात्यातील लाखो रुपयांची रक्कम हडप करतात. हितेश मेहतासारख्या जनरल मॅनेजरनी गोरेगाव व प्रभादेवी या शाखेतील 122 कोटी रुपये चोरून शेकडो खातेदारांना रस्त्यावर आणले आहे.

पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र बँकेतील (पीएमसी) बँकेतील व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, अध्यक्ष वरियम सिंग यांनीही अलीकडे तेच केले. हाऊसिंग डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) या कंपनीच्या राकेश वाधवान व सारंग वाधवान यांना बेकायदेशीरपणे कर्जवाटप करून 4 हजार 355 कोटी रुपयांचा घोटाळा केला तेव्हाही लोक रस्त्यावर आले. पीएमसी बँकेत ठेवी जमा करणारेही सामान्य खातेदार होते. ठेवीदारांच्या पैशांतून बँक मॅनेजर वाधवान पिता-पुत्रांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता उभारली. छोटी विमाने, बोटी, हिरेमोती विकत घेतले. पोलिसांनी ही मालमत्ता जप्त केली, येस बँकेच्या राणा कपूर या सीईओने 30 हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले, त्यात वाधवान पिता-पुत्रांचाही समावेश होता. स्वतःच स्थापन केलेल्या बोगस कंपन्यांना राणाने 20 हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले.

आयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचरनेही आपला पती दीपक कोचरच्या मदतीने आयसीआयसीआय बँकेची फसवणूक केली. व्यवस्थापकीय संचालक असलेल्या चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून अपात्र व्हिडीओकॉन ग्रुपला कर्ज वाटप केले. राणा कपूर, चंदा कोचर यांना अटक झाली. परंतु रिकव्हरी’चे काय? देशाची सामान्य माणसाची लूट करणारे एक तर जेलमध्ये जातात किंवा नीरव मोदी, विजय मल्ल्यासारखे हा देश सोडून पळून जातात. महाराष्ट्रातील शिखर बँक घोटाळ्यात सामील असलेल्या राजकीय पुढाऱ्यांचा तर बालही बाका झाला नाही. जनतेला भिकेला लावण्याचे, रस्त्यावर आणण्याचे काम आपले राज्यकर्तेच करीत आहेत. न्यू इंडिया सहकारी बँकेच्या संचालकांची नावे बघितली तर त्यात सत्ताधारी, राजकीय पुढाऱ्यांचीच अधिक नावे आहेत. हितेश मेहता हा त्यांचाच खास माणूस आहे. त्यामुळे जन हो सावधान! राजकीय, सत्ताधारी हा देश लुटत आहेत. हे लक्षात ठेवा. पैसे कुठेही गुंतविण्यापूर्वी सद्‌स‌द्विवेक बुद्धी शाबूत ठेवा!.