
कैरीचा सीझन आल्यावर घरोघरी कैरीच्या नानाविध रेसिपी तयार करण्याची सुरुवात होते. कैरीचे साधे सोपे लोणचे, पन्हे, सरबत, केरीचा किस, मुरांबा असे खूप पदार्थ उन्हाळ्यात घरी बनतात. पानातले डाव्या बाजूचे हे पदार्थ पचनासाठी उत्तम असल्यामुळे, हे उन्हाळ्याच्या दिवसात केले जातातच. पानात असलेले कैरीचे पदार्थ केवळ जिभेसाठी चवीचे नाही तर, आरोग्यासाठी सुद्धा तितकेच उपयुक्त आहेत.
कैरीची चटणी हा एक झटपट आणि जिभेला तृप्ती देणारा एक पदार्थ. कैरीची चटणी पानात डाव्या बाजूला असल्यावर, साधं सोपा मेन्यू असेल तरी पोटभरीचे होते. ही चटणी करायला तर खूप सोपी आहे शिवाय चटकदार असल्यामुळे, घरात सर्वांनाच आवडेल अशी आहे.
चटकदार कैरीची चटणी
साहित्य
कैरी- किमान दोन कैऱ्या
मीठ- चवीनुसार
मिरची- 5 ते 6
कोथिंबीर- चिरून घ्यावी किमान अर्धी वाटी
पुदीना- पाच ते सहा पाने
ओले खोबरे- अर्धी वाटी
कृती
कैरीची चटणी करण्यासाठी सर्वात आधी कैरीची साले नीट काढून घ्यावी. साले काढून झाल्यानंतर कैरीची बाठ काढून घ्यावी. त्यानंतर कैरीचे छोटे तुकडे करुन घ्यावेत. कैरीला डिक असल्यास, थोड्या पाण्यात कैरी नीट धुवून घ्यावी. कैरीचे बारीक तुकडे, खवलेले ओले खोबरे आणि मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करुन घ्याव्या. त्यानंतर दुसऱ्या फेरीत कोथिंबीर, मीठ, पुदीना घालून पुन्हा एकदा बारीक करुन घ्यावे. ही चटणी तयार होण्यासाठी केवळ पाचच मिनिटे लागतात. तुम्हाला आवडत असल्यास या चटणीला हिंग, जिरे, राई याची फोडणी सुद्धा देऊ शकता.