आवळा खा रोगांना दूर पळवा! जाणून घ्या आवळा खाण्याचे फायदे

आवळा, चिंचा, बोरं यांची गाडी आजही रस्त्यावर दिसल्यावर मन शाळेच्या दिवसांत फेरफटका मारून येते. शाळेबाहेरचा  हा रानमेवा आपल्या आरोग्यासाठी खरोखर हितकारक होता. चार आण्याची बोरं आणि चिंचा घेण्यात एक वेगळीच मजा असायची. आंबट तुरट चवीचा आवळा शाळेच्या दिवसातला आठवणींचा ठेवा होता.

आवळा हे पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. लोणचे, मुरब्बा, कँडी, रस आणि च्यवनप्राशच्या स्वरूपात आपण आवळ्याचे  सेवन करु शकतो. आवळा त्याच्या अँटी-ऑक्सिडंट, कर्करोग-विरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्मांसाठी देखील ओळखला जातो. हे सर्वात शक्तिशाली फळांपैकी एक मानले जाते. रोग बरा करण्यासाठी पूर्वापार आवळा वापरला जात आहे.

आवळा हा पॉलीफेनॉल आणि व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे. यामुळे पचन उत्तम होते. आवळ्यामुळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत होण्यासही खूप मदत होते. आवळा खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकले जातात. आवळ्यामध्ये असलेले पॉलीफेनॉल शरीराला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस यावर गुणकारी आहे. तसेच आवळा शरीराला इन्सुलिनच्या दिशेने अधिक प्रतिक्रियाशील बनवतो. यामुळे इन्सुलिनचे शोषण वाढते, अशा प्रकारे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

मधुमेहाची लक्षणे कमी करण्यासाठी कच्चा आवळा खाणे खूप फायदेशीर आहे. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. आवळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने बद्धकोष्ठता, अतिसार इत्यादी पाचन आजारांपासून आराम मिळण्यास मदत होते. याशिवाय आवळा खाल्याने पचनसंस्था निरोगी राहते.

आवळ्यामध्ये असलेले फायटोन्यूट्रिएंट्स मेंदूच्या पेशींना हानी पोहोचवणाऱ्या मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, अँटिऑक्सिडंट्स मेंदूचे कार्य सुधारतात. यामुळे स्मरणशक्ती वाढते. हे तणाव निवारक आहे कारण फळ शरीरात फील-गुड हार्मोन्स तयार करते.

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, टॅनिन, एमिनो अॅसिड असतात जे केसांना पोषण देतात. आवळा तेल केसांच्या मूळांना मजबूत करते. यामुळे डोक्यामध्ये कोंडा  होण्यास प्रतिबंध होतो. अशा प्रकारे आवळा केसांच्या वाढीस मदत करते. डोक्याला  आवळा तेलाची मालिश केल्याने केस अकाली पांढरे होत नाहीत, तसेच केसांचा नैसर्गिक रंग टिकतो.

(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)