
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत ‘छावा’ चित्रपट चर्चेत असतानाच आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. विकिपिडीयावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त मजकुर पोस्ट करण्यात आला होता. हा वादग्रस्त मजकुर आता नव्या वादाचे कारण झालेला आहे. या वादात अभिनेता कमाल आर खान याने ट्विट करून आगीत तेल ओतले आहे. कमाल आर खान याने एक्सवर पोस्ट करत हा वादग्रस्त मजकूर खरा असल्याचे म्हटले आहे. त्याच्या या वक्तव्यावरून आता कमाल आर खानवर सर्वच स्तरातून संतापाची लाट उसळली आहे.
‘छावा’ चित्रपटाला देशासह परदेशात पसंती मिळत असताना कमाल खान याने समीक्षा करतानाही कोतेपणा केल्याचे दिसून आले. ‘छावा’ चित्रपटाची समीक्षा करताना केवळ 1 स्टार दिल्यामुळे तो चर्चेत होताच. अशा पद्धतीने समीक्षा केल्यामुळे कमाल इंटरनेटवर ट्रोल झाला होता. पण त्यानंतर आता त्याने छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचे वादग्रस्त विधान एक्सवर पोस्ट केले. शिवाय हा मजकूर खरा असल्याचे त्याने म्हटल्यानंतर कमाल खानबद्दल मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे.
हिंदुस्थानात सामान्यपणे आपण कोणतीही माहिती शोधण्यासाठी विकिपिडिया वापरला जातो. माहितीचा स्त्रोत म्हणून विकिपिडियाचा वापर सर्वसाधारपणे केला जातो. परंतु विकिपिडियामध्ये छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात त्यांच्या प्रतिमेचे हनन करणारा मजकूर पोस्ट केला गेला होता. या मजकूरावरून देशभरातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या सर्व वादातच कमाल खान याने हाच मजकूर पुन्हा एक्सवर पोस्ट केल्यामुळे कमाल खानवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. 17 तारखेला कमाल खानने हा मजकूर पोस्ट केला. मजकूर पोस्ट झाल्यानंतर आता त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.