
चिवडा हा पदार्थ केवळ दिवाळीपुरता मर्यादीत राहिला नाही. तर चिवडा हा बारही महिने घरात उपलब्ध असणारा एक स्नॅक्सचा पदार्थ झालेला आहे. खमंग असा चिवडा हा लहानांसह मोठ्यांना सर्वांनाच आवडतो. चिवड्यावर कांदा लिंबू पिळून तर त्याची चव अधिकच भन्नाट लागते. पोटभरीचा खाऊ म्हणूनही चिवड्याचा पर्याय हा गृहिणींना सर्वात योग्य वाटतो. म्हणूनच बहुतांशी घरामध्ये चिवडा हा वरचेवर केला जातो. चिवडा हा कमी तेलात असल्यामुळे, वजन वाढण्याचे टेंशनही नसते. म्हणूनच स्नॅक्स म्हणून चिवडा हा सर्वांच्याच आवडीचा पर्याय ठरतो.
प्रत्येक प्रांताची चिवडा बनविण्याची एक खासियत असते. असाच नाशिकचा चिवडा अनोख्या चवीचा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो. नाशिकला कुणी जाणारा असेल तर, त्याला चिवडा आणण्यासाठी सांगितले जाते. अशाच खास नाशिकचा चिवडा आपणही घरी करुन या चिवड्याचा आस्वाद घेऊ शकतो.
नाशिक चिवडा रेसिपी
साहित्य
भाजके पोहे (नाशिक चिवडा भाजक्या पोह्यांपासून केला जातो.)
सुक्या खोबऱ्याचे काप
शेंगदाणे
उन्हात वाळवलेला कांदा
काळा मसाला
बारीक किसलेले आले
तिखट चवीनुसार
धने जिरे पूड
बारीक चिरलेला लसूण
तेल
फोडणीचे साहित्य
कृती- सर्वात आधी तेल तापवावे या तेलामध्ये क्रमाने कांदा, दाणे, डाळं आणि सुके खोबरे तळुन घ्यावेत. याच तेलामध्ये आलं आणि लसूणही तळावा. सर्व तळून झाल्यानंतर आलं आणि लसूण वाटून घ्यावे. फोडणीसाठी जिरे, मोहरी, कडीपत्ता टाकून त्यात वाटलेले आलं लसूण घालावे. त्यानंतर पोहे थोडे गरम करुन घालावेत. हे सर्व एकजीव करावे आणि त्यात वरुन धने-जिरे पूड, लवंग, दालचिनी पावडर घालावी. गॅस बंद करुन हा चिवडा थंड होऊ द्यावा. सर्वात शेवटी तळलेला कांदा चुरुन घालावा. चिवडा थंड झाल्यानंतरच डब्यात भरुन ठेवावा.