
उन्हाच्या झळांनी तुम्ही एव्हाना चांगलेच हैराण झाले असाल. याच उन्हाळ्यावर मात करण्यासाठी आपल्या आहारात बदल करणे हे खूप गरजेचे आहे. उन्हाच्या झळांनी कासावीस झालेल्या जीवाला थंडगार करण्यासाठी, पारंपरिक ज्वारीच्या आंबीलची रेसिपी आपण पाहणार आहोत. ज्वारीची आंबील ही सर्वात पौष्टीक मानली जाते. खासकरून उन्हाळ्यामध्ये ज्वारीची आंबील बहुतांशी घरामध्ये केली जाते.
पारंपरिक पद्धत पाहता आंबील ही मातीच्या मडक्यात बनवली जायची. पूर्वीच्या काळी शेतातील कामे करण्यासाठी उन्हातान्हात राबावे लागत असे. अशावेळी सकाळी घरून आंबील पिऊन शेतावर गेल्यावर, तेवढा शरीराला थंडावा मिळत असे. आंबील ही रेसिपी खासकरून विदर्भ, खान्देश, घाटावर खूप केली जात असे. परंतु आता शहरातील घरांमध्येही आंबीलने शिरकाव केलेला आहे.
ज्वारीची आंबील प्रकार- 1
साहित्य-
ज्वारीचे पीठ- एक वाटी
चवीप्रमाणे मीठ
सात ते आठ वाट्या पाणी
कृती-
एक वाटी ज्वारीचे पीठ असेल तर सहा ते सात वाटी पाणी, चवीप्रमाणे मीठ कालवून पीठ एकजीव करून रात्री भिजवून ठेवावे. सकाळी हे आंबलेले मिश्रण शिजवून, थंड करून प्यावे. यामध्ये कांदा पण घालण्याची पद्धत आहे. पण हा पर्याय तुमच्या आवडीनुसार तुम्ही निवडू शकता.
ज्वारीची आंबील प्रकार- 2
ताक टाकूनही आंबील बनवली जाते. गॅसवर कढईमध्ये तेल टाकावे. तेल तापल्यानंतर जिरे व लसणाचे तुकडे परतून त्यात तीन ते चार छोटे चमचे ज्वारीचे पीठ टाकून कमी गॅसवर थोडे परतून हिंग पावडर टाकावी. हे मिश्रण गुठळ्या न होवू देता ढवळत राहावे. मिश्रण घट्ट वाटल्यास त्यात ग्लासभर पाणी ओतून उकळी आणावी. हे मिश्रण थंड होवू द्यावे. यात आल्याचा छोटा तुकडा व एक हिरवी मिरची बारीक वाटून घालावी.
दुसऱ्या भांड्यात तीन ते चार ग्लास ताक घेवून त्यात भाजलेले जिरे, धने पावडर, मीठ कोथिंबीर, वाटलेले आले मिर्ची व शिजवलेले ज्वारीच्या पिठाचे मिश्रण घालावे. रवीने चांगले एकजीव करून थंड आणि पाचक पौष्टीक आंबील पिण्यासाठी तयार.