
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सिडकोमध्ये कार्यरत असलेल्या सम्राटांची ठरावीकच विभागात असलेली मक्तेदारी अखेर मोडीत काढली आहे. मलईदार विभागात गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी दुसऱ्या विभागात पाठवले आहे. सर्वच विभागातील 128 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सिंघल यांनी होलसेल बदल्या केल्यामुळे सिडकोच्या कर्मचारी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सिडकोमध्ये साडेबारा टक्के योजना, अतिक्रमण यांच्यासह काही विभाग मलईदार विभाग म्हणून ओळखले जातात. सिडकोचे बहुतेक अधिकारी तीन ते चार विभागात काम करीत आहेत. दुसऱ्या विभागात बदल्या झाल्या तरी काही महिन्यात अधिकारी पुन्हा याच विभागात येत आहेत. अशा सम्राटांची मक्तेदारी व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी मोडीत काढली. ठरावीक विभागात काम करणारे शिपाई, मुकादम, सफाई कामगार, सहाय्यक विकास क्षेत्र अधिकारी, लिपिक, टंकलेखक आदी कर्मचाऱ्यांच्या तातडीने बदल्या करण्यात आल्या. अन्य विभागात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना साडेबारा टक्के योजना आणि वसाहत विभागात काम करण्याची संधी देण्यात आली आहे. या बदलीचा आदेश काढल्यानंतर बदली झालेल्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी तातडीने रुजू व्हावे, अशी तंबीही एमडींनी दिली होती. त्यामुळे इच्छा नसतानाही अनेक कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे लागले आहे.
मलईदार विभाग न मिळाल्याने नाके मुरडली
सिडकोमध्ये ठरावीक विभागात मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन होत असले तरी काही विभागात मात्र चिरीमिरीही मिळत नाही. प्रस्थापितांच्या वाट्याला असेच विभाग आल्यामुळे त्यांची अवस्था दयनीय झाली. बदलीचे ठिकाण पाहून काहींना तर धक्काच बसला. काहींनी अक्षरशः नाके मुरडली. अनेकांनी नगरविकास विभागात आपले वजन वापरून बदली रद्द करण्याचा प्रयत्न केला. मात्र सिंघल यांनी यादी बदलणार नाही, अशी भूमिका घेतल्याने त्यांची पंचाईत झाली.