
स्वरयंत्रणेचा पक्षाघात झालेल्या एका 24 वर्षीय तरुणीला तिचा आवाज पुन्हा मिळाला आहे. या तरुणीवर खारघरमधील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. मज्जातंतूमध्ये झालेल्या दुखापतीमुळे तिने आपला आवाज गमावला होता. मात्र मेडिकव्हरच्या डॉक्टरांनी केलेल्या यशस्वी उपचारानंतर ती आता स्पष्टपणे बोलू लागली आहे.
पनवेलमध्ये राहणारी ही 24 वर्षीय तरुणी आयटी क्षेत्रात काम करते. अचानक तिचा आवाज कमकुवत होऊ लागला. तिने खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलकडे धाव घेतली व आवश्यक तपासणी केल्यानंतर तिला डाव्या बाजूचा व्होकल फोल्ड पॅरालिसिस (स्वरयंत्राचा पक्षाघात) असल्याचे उघड झाले. त्यानंतर तिच्यावर मेडिकव्हर हॉस्पिटलच्या लॅरिन्गोलॉजिस्ट डॉ. फरहा नाझ काझी आणि डॉ. दीपक खन्ना यांच्या पथकाने उपचार करण्यास सुरुवात केली. तिच्यावर आवश्यक त्या शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. त्यानंतर या तरुणीचा गेलेला आवाज पुन्हा आला.
आता पूर्वीसारखे बोलू शकते
मला बोलताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अगदी साध्या शब्दांच्या उच्चारानेदेखील मला थकवा जाणवायचा. माझा आवाज गमावल्याने मी माझा आत्मविश्वासही गमावला होता. प्रियजनांशी संवाद साधण्यात येणाऱ्या अडचणी तसेच माझ्या दैनंदिन कामांवरही याचा परिणाम होऊ लागला, परंतु माझा आवाजच नाही तर माझा आत्मविश्वासही परत मिळाला आहे. माझ्या स्वरयंत्रणेवर कोणताही ताण न येता मी आता पूर्वीसारखी बोलू शकते अशी प्रतिक्रिया या तरुणीने व्यक्त केली आहे.