मंत्रालयात अंडरवर्ल्ड! समांतर सरकारमुळे राजकीय अराजक; संजय राऊत यांनी महायुतीची पिसं काढली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात समांतर सरकार चालवायला सुरुवात करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले आहे. मंत्रालयातील मुख्यमंत्री वॉर रूमच्या धर्तीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःचा को-ऑर्डिनेशन रूम सुरू करून आपले वेगळे सत्ताकेंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. हे कमी म्हणून की काय, स्वतंत्र वैद्यकीय कक्षाची निर्मिती करून महायुती सरकारमध्ये आपली वेगळी चूल मांडल्याने मंत्रालयात नवा पेच निर्माण झाला आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारची पिसं काढली आहेत. मंगळवारी सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे यांचा स्वतंत्र वैद्यकीय कक्ष आहे. स्वतंत्र वॉर रुम आहे. स्वतंत्र को-ऑर्डिनेशन रुम आहे. पालकमंत्रीपदावरूनही महायुतीत वॉर सुरू आहे. शिंदे स्वत:ची स्वतंत्र कॅबिनेटही घेतात. फडणवीस यांचे आदेश फार पाळू नका असे त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना सांगितले आहे. अशा प्रकारचे आव्हान एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये निर्माण झाले होते, असे राऊत म्हणाले.

मंत्रालयात आता अंडरवर्ल्ड सुरू आहे. समांतर सरकार सुरू आहे. असं प्रति सरकार सुरू असेल तर राज्याची अवस्था बिकट आहे. मंत्रालयात राजकीय अराजक निर्माण झाले आहे. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोडून काढणार नसतील तर हे राज्यच अराजकाच्या खाईत ढकलले जाईल. ज्यांचे 57-58 आमदार भाजपने ईव्हीएमच्या ताकदीवर निवडून आणले तेच त्या ताकदीवर सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही राऊत म्हणाले.

सरकारने शिंदेंच्या आमदारांची वाय सुरक्षा काढली. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, यांनी राज्याचीच वाय झेड करून टाकली असून हे वेड्यांचे सरकार आहे. मंत्रालयामध्ये वेड्यांची जत्रा आहे. शासकीय कार्यालत गोंधळ असून गृहनिर्माण खाते, एसआरए, म्हाडामध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. पैसे दिल्याशिवाय सामान्य लोकांची कामं होत नाहीत. मंत्र्यांकडे रोकडा मोजून अधिकाऱ्यांची नेमणूक केल्याने हे अधिकारीही रोज कोट्यवधींचा गल्ला जमवून संबंधित मंत्र्यांच्या चरणी अर्पण करत आहेत. कोणत्या प्रकल्पातून किती पैसे घेतले आणि कुठे दिले ही माहिती लवकरच जाहीर करणार असल्याचा इशाराही राऊत यांनी दिला.

दरम्यान, शिंदे आमदार, खासदारांना घेऊन महाकुंभला जाणार आहेत. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, फडणवीस यांनी त्यांना अंग घासण्यासाठी एक पवित्र साबण द्यावा. कुंभमध्ये गद्दारांनी किती पाप धुतले तरी जाणार नाही. गंगा पवित्र असून तिने आपले पावित्र्य जपले आहे. साधू, संत, पुण्यात्मे, निष्पाप सामान्य माणूस तिथे जातो तेव्हा त्याला पुण्य मिळते. गद्दार, बेईमान आणि भ्रष्टाचारांना तिथे जाऊन पुण्य मिळणार नाही.