दशक्रिया विधीत मधमाशांचा हल्ला, मृतांचे कुटुंबीय सैरावैरा पळाले; भटजींनी नदीत डुबकी मारली

पनवेलच्या कर्नाळा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकांना मधमाशांनी डंख मारल्याची घटना ताजी असतानाच तिळसेश्वर येथे दशक्रिया विधी सुरू असताना मधमाशांनी हल्ला केल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. मधमाशांच्या तावडीतून स्वतःची सुटका करण्यासाठी मृतांच्या कुटुंबीयांनी मिळेल त्या मार्गाने सैरावैरा पळ काढला. भटजींनी तर नदीत डुबकी मारली. तरीही पाण्यावर मधमाशा घोंगावत होत्या. त्यामुळे भटजींनी 20 मिनिटे पाण्यातच मुक्काम ठोकला.

भावेघर येथील एका मृत व्यक्तीचा तिळसेश्वर येथे दशक्रिया विधी सुरू होता. या विधीसाठी सुमारे 100 नातेवाईक त्या ठिकाणी उपस्थित होते. विधीसाठी होम करण्यात आला होता. या होमाच्या धुरामुळे शंकराच्या मंदिराशेजारी असलेल्या झाडावरील मधमाशा भडकल्या आणि त्यांनी नातेवाईकांवर हल्ला केला. यात सुमारे 20 ते 25 जण जखमी झाले. मधमाशांच्या हल्ल्याने घाबरगुंडी उडालेले नातेवाईक वाट सापडेल तिकडे धावत सुटले.

उपचारानंतर पुन्हा विधी सुरू

भटजींवरही मधमाशांनी हल्ला केला. अनेक ठिकाणी मधमाशांनी डंख मारल्याने जखमा झाल्या होत्या. मधमाशांच्या हल्ल्यातून सुटका करण्यासाठी भटजींनी नदीत डुबकी मारली. पाण्यावर माशा घोंगावत होत्या. तब्बल 20 मिनिटे ते पाण्यातच राहिले. माशा गेल्यानंतर भटजींनी खासगी दवाखाना गाठला. प्राथमिक उपचार घेऊन भटजी पुन्हा घाटावर आले आणि दशक्रिया विधी सुरू केला.