वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांची जलसंजीवनी, कास परिसरातील पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा

आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि कमी होणारे नैसर्गिक जलस्रोत लक्षात घेता, जावली तालुक्यातील कास पठार परिसरातील वन्यप्राण्यांसाठी सातारा वन विभाग आणि कास पठार कार्यकारी समितीच्या वतीने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये नियमितपणे पाणी सोडण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे.

उन्हाळ्यात कास पठार आणि आसपासच्या जंगलातील प्राण्यांसाठी पाण्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे या समस्येवर उपाय म्हणून सातारा वन विभाग आणि कास पठार कार्यकारी समितीने सात ते आठ वर्षांपूर्वी कृत्रिम पाणवठ्यांची स्थापना केली होती. कास पठारच्या कार्यकारी समितीने वन विभागाच्या सहकार्याने दोन महिन्यांपूर्वी या कृत्रिम पाणवठ्यांचे स्वच्छता कार्य पूर्ण केले होते. त्यामुळे पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू होऊ शकली. आता गेल्या आठवड्यापासून या पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी सोडण्यात येत आहे. वन्यप्राण्यांसाठी जलसंजीवनी ठरणारे हे पाणवठे आगामी उन्हाळ्यात अधिक उपयुक्त ठरतील.

सातारा वन विभागाचे उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, सहायक उपवनसंरक्षक प्रदीप रौंदळ यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरसह दुर्गम भागातील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यजीवांसाठी पाणवठे तयार करण्यात आलेले आहेत. कास पठार, वांजळवाडी, कुसुंबीमुरा, आटाळी, घाटाई फाटा आणि कास तलावाच्या पलीकडील परिसरात 36

वन्यप्राण्यांचे अस्तित्व सुरक्षित ठेवण्यास मदत

■ कास पठार हे ‘युनेस्को’ने घोषित केलेले जागतिक वारसास्थळ आहे. त्यामुळे येथील वन्यप्राणी, पक्षी, कीटक आणि वनस्पतींचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या कृत्रिम पाणवठ्यांमुळे वन्यप्राण्यांचे अस्तित्व सुरक्षित ठेवण्यास मोठी मदत होईल.

फुलांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कास परिसरातदेखील मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या ठिकाणी बिबट्यांसह वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात रात्री पाण्यासाठी येत असतात. त्यामुळे कास पठार आणि आसपासच्या परिसरातील वन्यप्राण्यांसाठी आम्ही नियमितपणे पाणी सोडत आहोत. हे पाणी कमी होऊ नयेत, यासाठी आम्ही सातत्याने निगराणी ठेवत आहोत. या यशस्वी प्रयत्नांमुळे कास पठार परिसरातील वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येणार नाही आणि त्यांना आवश्यक पाणी वेळेवर मिळेल.
राजाराम काशिद, वनपाल, कास पठार