
कुस्तीप्रेमींच्या जनसागरासमोर लाल मातीत झालेल्या संघर्षात हिंदुस्थानच्या पैलवानीनेच आपला दबदबा दाखवला. जामनेरमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगलमध्ये महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीसह सर्वच हिंदुस्थानी पैलवानांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परदेशी पैलवानांना धूळ चारत आपले वर्चस्व दाखवून दिले.
आपल्या तालुक्यात कुस्तीच्या मैदानात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय पैलवान येणार असल्यामुळे आज 50 हजारांपेक्षा अधिक कुस्तीप्रेमींचा जनसागर पसरला होता. यात महाराष्ट्र केसरी विजेत्यांनी जगभरातील 9 देशांमधून आलेल्या नामवंत पैलवानांना पराभूत करत कुस्तीच्या मैदानी परंपरेचा अभिमान वाढवला. या कुस्तीत महिलांना समान सन्मान देताना या मैदानातील पहिली आणि शेवटची कुस्ती महिलांची लावण्यात आली. कुस्तीच्या इतिहासात प्रथमच महिला कुस्तीला हा सन्मान मिळाल्यामुळे महिला कुस्तीपटूंमध्ये आणि कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण दिसले.
महाराष्ट्र केसरी विजेत्या अमृता पुजारीने रोमानियाच्या ऑलिम्पियन पॅटालिना क्सेन्टने हिच्यावर वर्चस्व गाजवत विजय नोंदविला. शेवटच्या कुस्तीमध्ये अमृताने उत्कृष्ट डावपेच आणि चपळाईने गुण मिळवत आपला पराक्रम सिद्ध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विश्वविजेता व ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीला सन्मानित करण्यात आले. तसेच सर्व विजेत्यांना मानाची गदा देऊन गौरविण्यात आले.
जामनेर नगरीत झालेल्या या दंगलीत विजय चौधरीने दबदबा दाखवताना आशियाई विजेता उझबेकिस्तानच्या सुक्सरोब जॉनला केवळ दोन मिनिटांत चीतपट करत प्रेक्षकांची मने जिंकली. पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बांगडीने फ्रान्सच्या वर्ल्ड चॅम्पियन अंजलीक गोन्झालेझ हिच्यावर सहज विजय मिळवला. तिच्या अचूक चालींमुळे तिने विरोधकाला गुण मिळवण्याची संधी दिली नाही. तसेच महाराष्ट्र केसरी विजेती सोनाली मंडलिक हिने एस्टोनियाच्या मार्टा पाजूला हिला पराभूत करून प्रथम गुण घेत प्रभावी विजय मिळवला. महाराष्ट्र केसरी सिपंदर शेखने युरोपियन चॅम्पियन मोल्दोवाच्या घेओघे एरहाणला चीतपट करत आपली ताकद सिद्ध केली.
तसेच महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने जॉर्जियाच्या वर्ल्ड चॅम्पियन इमामुकवर विजय मिळवत हिंदुस्थानी कुस्तीतील स्वतःचे स्थान भक्कम केले. उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाडने रोमानियाच्या युरोपियन चॅम्पियन फ्लोरिन ट्रिपोनला पराभूत करत उत्कृष्ट कामगिरी बजावली. डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने वर्ल्ड चॅम्पियन गुलहिर्मो लिमाला सहज चीतपट केले. त्याच्या कुस्तीतील सफाईदार खेळाने उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. महाराष्ट्र चॅम्पियन बाळू बोडके आणि मुन्ना झुंजुर्पे यांनी अनुक्रमे हरयाणाच्या राष्ट्रीय विजेत्या मनजीत मेला व दिल्लीच्या हरिओमी ट्रक्टर यांना पराभूत करून आपली ताकद दाखवली.
महाराष्ट्राचा राष्ट्रीय विजेता शिवा चव्हाण आणि हरयाणाच्या त्रिमूर्ती केसरी रजत मंडोथी यांची कुस्ती अत्यंत चुरशीची ठरली व अखेरीस बरोबरीत सोडवण्यात आली. पंजाबच्या भारत केसरी भूपिंदर सिंहने हरयाणाच्या राष्ट्रीय विजेता युधिष्ठर दिल्ली याला चीतपट करत प्रभावी विजय नोंदवला. महाराष्ट्राचा भवानी केसरी वेताळ शेळकेने दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विजेता जॉन्टी गुज्जरचा पराभव करून प्रेक्षणीय विजय मिळवला. तसेच महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरने इराणच्या एशिया मेडालिस्ट जलाल म्हजोयूबला चीतपट करत जबरदस्त कौशल्य दाखवले.
या सर्व कुस्त्यांसाठी पंच आणि संयोजक म्हणून हिंदकेसरी रोहित पटेल यांनी काम पाहिले. 9 देशांच्या या स्पर्धेत हिंदुस्थान, फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, रोमानिया, एस्टोनिया, इराण, ब्राझील आणि जॉर्जिया या देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. राजू आवळे कोल्हापूर यांच्या हलगीच्या आवाजने मैदान दुमदुमले होते.