
अवघ्या एका धावेच्या आघाडीमुळे उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या केरळच्या फलंदाजांनी आज कासवगतीने फलंदाजी करत 89 षटकांच्या खेळात अवघ्या 4 बाद 206 धावा केल्या. कर्णधार सचिन बेबीने 193 चेंडूंचा सामना करत नाबाद 69 धावा केल्या. दिवसअखेर बेबी आणि मोहम्मद अझरुद्दीन (30) खेळत होता.
केरळने टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली, पण दवामुळे संथ झालेल्या खेळपट्टीवर त्यांना एकेक धाव काढणे कठीण झाले. अक्षय चंद्रन आणि रोहन कुन्नमुलने 60 धावांची सलामी दिली व हे दोघेही 30 धावांवर बाद झाले. सर्वात आश्चर्याचे म्हणजे आज बाद झालेले तीन फलंदाज योगायोगाने 30 धावांवर बाद झाले, तर दिवसअखेर अझरुद्दीनही 30 धावांवरच नाबाद आहे. कर्णधार बेबीने शंभरीत 3 फलंदाज बाद झाल्यावर जलज सक्सेनासह 71 धावांची भागी रचली, तर अझरुद्दीन बरोबर 49 धावांची अभेद्य भागी करत संघाला दोनशेचा टप्पा ओलांडून दिला.