
दिल्ली-एनसीआर आज भूकंपाने हादरले. पहाटे 5 वाजून 36 मिनिटांनी दिल्लीकरांना 4 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमधील लोक घाबरून घराबाहेर पडले. भूकंपामुळे कुठेही पडझड किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरून लोकांना शांत राहाण्याचे आवाहन केले असून अधिकारी परिस्थितीतीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती दिली. दरम्यान, भूकंपामुळे काही ठिकाणी झाडे मुळासकट उन्मळून पडली.
भूकंपाचे केंद्र धौला कुआन येथील दुर्गाबाई देशमुख कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशनजवळ असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याठिकाणी दर दोन ते तीन वर्षांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवतात अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याआधी 2015 मध्ये या ठिकाणी 3.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. दिल्लीकर सुरक्षित आहेत अशी आशा करतो. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत हेल्पलाइन क्रमांक 112 वर कॉल करावा असे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे.