
पाचगणी, महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी असते. वीकेंडला तर रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. पर्यटकांची वाढती गर्दी, त्यामुळे निर्माण झालेली वाहतूककोंडी आणि परीक्षेला होत असलेला उशीर यामुळे एका विद्यार्थ्याने पॅराग्लायडिंग करत चक्क परीक्षा केंद्र गाठले.
साताऱ्यातील पसरणीत ही घटना घडली. समर्थ महांगडे चक्क हवेत उडत परीक्षा केंद्रावर पोचला. कामानिमित्त समर्थ पाचगणीला गेला होता. तिथे गेल्यावर समजले की परीक्षेचे वेळापत्रक बदलले आहे. मित्राने आजच पेपर असल्याचे सांगितल्यावर पेपरला पोचता येणार नाही, या कल्पनेने समर्थला टेन्शन आले. त्याला पॅराग्लायडिंग ट्रेनर गोविंद येवले यांनी मदत केली.
वाई पाचगणी रोडवर असणाऱ्या पसरणी घाटात वाहतूककोंडी असते. त्यामुळे समर्थपुढे कोणताही पर्याय नव्हता. समर्थने भीतभीत पॅराग्लायडिंग करण्याचा निर्णय घेतला. या प्रसंगात पॅराग्लायडिंग संस्थेच्या संस्थापकांनीही त्याला मदत केली. त्यांनी त्याला पॅराग्लायडिंग करून परीक्षा केंद्रावर सोडण्याचे ठरवले आणि सुरक्षितपणे पोचवले.